Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या मनसे (MNS) मेळाव्यात राज ठाकरे यांनी जाहीर केलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रभरातून त्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उभे केले जाऊ लागले. बिनशर्त मोदी सरकारला पाठिंबा राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जाहीर केला आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रात आता मनसे देखील भाजपच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पण त्यांच्या पाडवा मेळाव्यातील भाषणामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट ठरले. या सगळ्यावर राज ठाकरे यांनी बोल भिडू या युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाष्य केलं आहे.
दरम्यान राजकारणासाठी राज ठाकरे यांचं नाव जितकं आग्रहाने घेतलं जातं, तितक्याच आग्रहाने त्यांचं सिनेमा आणि कलेवरील प्रेमासाठी देखील घेतलं जातं. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी त्यांच्या सिनेमाविषयीच्या प्रेमाचा असाच एक किस्सा सांगितला आहे. राज ठाकरे यांना त्यांच्या यंदाच्या पाडव्याच्या भाषणाविषयची प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या स्वदेस सिनेमाचा संदर्भ दिला. तसेच त्यांनी त्यावेळचा एक प्रसंग देखील सांगितला.
काय होती राज ठाकरेंची प्रतिक्रिया?
राज ठाकरेंनी म्हटलं की, 'मी स्वदेस पाहायला गेलो होतो. आशुतोष गोवारीकर यांनी आमच्यासाठी त्या सिनेमाचा प्रिव्ह्यु ठेवला होता. इंटरवल बाहेर आलो, आशुकडे पाहिलं पुन्हा आत गेलो. सिनेमा पाहून झाल्यानंतर त्याला म्हटलं की, अरे हे काय केलंयस. मला तेव्हा अजिबात सिनेमा आवडला नाही. त्याला म्हटलं हा काय सिनेमा आहे का, असं काहीतरी बोललं मी त्याला. आजही त्यासाठी मला वाईट वाटतं. पण मी घरी आल्यानंतर शांतपणे विचार केला की, मी सिनेमा पाहिला का? कारण तेव्हा माझ्या बॅक ऑफ द माईंड लगान होता. मी तिथे माझा एक स्वत:चा डोक्यात एक सिनेमा घेऊन गेलो होतो. पण तसं काहीच मला दिसलं नाही. तेव्हा मला कळलं की मी सिनेमाचं नाही पाहिला.'
दुसऱ्यांदा थिएटर बूक करुन सिनेमा पाहिला - राज ठाकरे
पुढे त्यांनी म्हटलं की, 'एक छोटं थिएटर बूक केलं आणि एकट्याने स्वदेस पाहिला. ज्यावेळी तो ट्रेनचा सिन आहे, तो गावात जाऊन येतो आणि पहिल्यांदा त्या मुलाकडून पाणी पितो, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी तिथूनच आशुतोषला मेसेज केला. मी त्याला म्हटलं, की सॉरी, मी त्या दिवशी सिनेमा पाहू शकलो नाही. आता पाहिला, अप्रतिम सिनेमा आहे. मी थिएटरचा दरवाजा उघडून बाहेर आलो, सोफ्यावर आशुतोष बसला होता. त्याला कुणीतरी सांगितलं की, मी सिनेमा पाहतोय.'