Prajakta Mali : प्रवास विकृतीकडे सुरू झालाय..., प्राजक्तासाठी सिनेसृष्टीतून प्रतिक्रिया; सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर राजकारण्यांवर व्यक्त केला तीव्र संताप
Prajakta Mali : अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ आता सिनेसृष्टीतूनही प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. निर्माते नितीन वैद्य यांनीचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
Prajakta Mali : संतोष देशमुख (Santosh Desmukh) यांच्या हत्येनंतर आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. आरोप करताना सुरेश धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख करत अभिनेत्री प्राजक्ता माळीसह (Prajakta Mali) आणखी काही अभिनेत्रींची नावं घेतलीत. यानंतर प्राजक्तानेही सुरेश धस यांची महिला आयोगात तक्रार दाखल केली आणि सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणीही केली आहे. या सगळ्यावर कलासृष्टीतूनही प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. निर्माते नितीन वैद्य आणि अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
महाराष्ट्राची हास्यजत्राचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी देखील यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. तसेच नृत्यांगणा गौतमी पाटील देखील प्राजक्तासाठी मैदानात उतरली आहे. त्यामुळे सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यानंतर कलासृष्टीतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तुमच्या घाणेरड्या राजकारणात कलाकारांना ओढू नका असा इशारा देखील मनसे चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी दिलाय.
नितीन वैद्य यांनी काय म्हटलं?
नितीन वैद्य यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, महाराष्ट्रातील राजकारणी आणि प्रसारमाध्यमं यांचा प्रवास विकृतीकडे सुरू झाला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासोबत सुसंस्कृत महाराष्ट्राने ठामपणे उभं राहिलं पाहिजे. कलाक्षेत्रातील वा कोणत्याही क्षेत्रातील महिलांची बदनामी हा पुरूषप्रधान मनोवृत्तीचाच एक भाग आहे. ही विकृती आहे. मुग्धा गोडबोले यांनी नितीन वैद्य यांची हिच पोस्ट शेअर करत आय सपोर्ट प्राजक्ता माळी असं हॅशटॅग दिलं आहे.
सचिन गोस्वामी यांनी काय म्हटलं?
सचिन गोस्वामी यांनी प्राजक्तासाठी पोस्ट करत म्हटलं की, ज्या समाजात महिलांचा सन्मान राखला जातो तो समाज सभ्य समजला जातो.कलेचा आणि कलावंतांचा आदर जपणारा समाज सुसंस्कृत समाज असतो. प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते निषेधार्ह आहे..क्लेषदायक आहे.. आपण निकोप सुदृढ समाजाचा आग्रह धरू या.
गौतमी पाटीलचाही प्राजक्ताला पाठिंबा
गौतमीने प्राजक्तासाठी पोस्ट करत म्हटलं की, 'कलाकार हा कलाकार असतो. त्याचं नाव कुणासोबत जोडून त्याची बदनामी करणं चुकीचं आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य असून आपण तिच्या भूमिकेचं समर्थन करते. '