कोलकाता : वारंवार खोडसाळ आणि आक्रमक ट्वीट करुन चर्चेत राहणारी कंगना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार कंगनानं केलेले ट्विट हे अपमानास्पद असून, पश्चिम बंगल आणि तेथील नागरिकांची अवहेलना करणारे असल्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्याचा मुद्दा अधोरेखित करत या तिच्याविरोधात कोलकाता पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 


अॅड. सुमीत चौधरी यांनी ई मेलच्या माध्यमातून थेट कोलकात्याचे पोलीस आयुक्त सुमेन मित्रा यांच्याकडेच यासंदर्भातील तक्रार केली. यामध्ये त्यांनी कंगनाच्या ट्विटच्या लिंकही पुरावा म्हणून जोडल्याचं म्हटलं जात आहे.


आपल्याला राजकारणाशी काहीही देणंघेणं नाही, यामध्ये प्रवेशही करायचा नाही. पण कंगनानं ज्या प्रकारे हे अवहेलनाजनक ट्विट केले आहेत त्यामुळं पश्चिम बंगालमधील सर्वच नागरिकांच्या विशेषत: ज्यांनी मतदान केलं आहे त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. मतदान करणं हा तफक्त संविधानिक हक्क नसून हे त्यांचं कर्तव्यही आहे, असं म्हणत कंगनाच्या ट्विटच्या माध्यमातून हिंदूंची संख्या अधिक नसल्यामुळे त्यांना बंगालमध्ये धोका असल्याचं भासवण्यात आलं असून हे पूर्णत: चुकीचं आहे, असं ठाम मत चौधरी यांनी मांडलं आहे. 
कंगनाचे ट्विट पाहून माझ्याच मनात भीती, द्वेषाची भावना जागृत झाली, इतरांच्याही ती झाली असेल, असं म्हणत त्यांनी कंगनावर आक्षेप घेतला. 


वैवाहिक नात्यातून विभक्त होताना बिल गेट्स- मेलिंडा यांचा मोठा निर्णय 


कंगनानं ट्विटमध्ये काय म्हटलं होतं? 


'बांगलादेशी आणि रोहिंग्या हेच ममता बॅनर्जी यांची ताकद आहेत. इथं हिंदूंची संख्या जास्त नाही हे स्पष्ट होत आहे. आणि माहितीनुसार बंगाली मुस्लिम हे सर्वात गरीब आहेत. चांगलं आहे, देशात आणखी एक काश्मीर आकारास येत आहे... ', असं ट्विट तिनं केलं होतं. तिनं आणखी एका ट्विटच्या माध्यमातून पश्चिम बंगालमध्ये भाजपला कशा प्रकारे यश मिळालं आहे, याबाबत ट्विच करत देशातील सत्ताधारी पक्षाची प्रशंसा केली होती. 














कंगनाच्या याच ट्विटमुळं तिच्या मतप्रदर्शनामुळं अनेक मार्गांनी पश्चिम बंगाल आणि तेथील नागरिकांचा अवमान झाल्याचा मुद्दा अधोरेखित करत तक्रारकर्त्या वकिलांनी तिच्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी पोलीस यंत्रणेकडे केली आहे. असं न केल्यास कंगना समाजात अशाच प्रकारे द्वेषाची भावना परसवेल अशाी भीतीही त्यांनी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे.