नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि जगभरातील बहुचर्चित व्यक्तिमत्त्वांपैकी एक असणाऱ्या बिल गेट् आणि त्यांची पत्नी मेलिंडा गेट्स यांनी त्यांच्या वैवाहिक जीवनाचा प्रवास आता इथवरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून त्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जीवनातील पुढच्या टप्प्यात आपण एकत्र जाऊ शकत नाही, असं म्हणत ही जोडी या निर्णयावर पोहोचली आहे.
सध्याच्या घडीला या दोघांनीही परस्पर सहमतीनं हा निर्णय घेतला आहे. बिल गेट्स यांनी ट्विट करत लिहिलं, 'आम्ही आमच्या नात्याबाबत फार विचार केला. अखेरीस हे नातं इथंच थांबवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. जीवनाच्या या पुढच्या टप्प्यावर आम्ही एकत्र पुढे जाऊ शकू याचा आम्हाला फारसा विश्वास नाही. आता आम्हा दोघांनाही आपआपला वेगळा असा वेळ हवा आहे. आम्ही जीवनाच्या नव्या टप्प्याच्या दिशेनं जाऊ इच्छितो'.
Corona Relief Fund : प्रियांका चोप्राच्या गिव्ह इंडिया कॅम्पेनने जमवला जवळपास पाच कोटींचा निधी
जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या बिल गेट्स यांच्या या निर्णयानंतर आता त्यांच्या आर्थिक आणि व्यावसायित गोष्टींचाही या नात्यावर काही परिणाम होणार आहे का याबाबतच्या निर्णयाची अद्याप स्पष्टोक्ती करण्यात आलेली नाही. दरम्यान, बिल गेट्स आणि मेलिंडा हे दोघंही एका स्वयंसेवी संस्थेचा भाग आहेत. 2000 मध्ये त्यानी या संस्थेची सुरुवात केली होती. वैवाहिक नात्यातून ते वेगळे होत असले तरी त्यांची बिल ॲंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन वेगळी होणार नाही. ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था असून, या संस्थेत ते दोघंही एकत्र काम करणार आहेत. यापुढं हे दोघंही नात्याच्या बाबतीत आणखी कोणते निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.