नवी दिल्ली : सोमवारी संपूर्ण जगालाच एका निर्णयानं धक्का बसला. हा निर्णय होता मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाचा. जवळपास 27 वर्षांच्या वैवाहिक नात्यातून वेगळं होत त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही या निर्णयासोबतच आणखी एका निर्णयाचीही त्यांनी घोषणा केल्याचं कळत आहे. 


जगातील सर्वाधिक मोठ्या समजल्या जाणाऱ्या बिल ॲंड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन  या स्वयंसेवी संस्थेसाठी हे दोघंही एकत्र काम करणं सुरुच ठेवणार आहेत. खुद्द बिल आणि मेलिंडा यांनी ट्विट करत आपण या नात्यातून वेगळं होत असल्याची माहिती दिली. सोबतच आपल्या खासगी जीवनातील गोपनीयतेला अंदाजात घेत आवश्यक तो वेळ इतरांक़डून आपल्याला दिला जाईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 


$100 billion इतकं वार्षिक उत्पन्न असणाऱ्या बिल गेट्स यांच्या नावाचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता. 1994 मध्ये हवाई येथे बिल आणि मेलिंडा विवाहबंधनात अडकले होते. मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून मेलिंडा कार्यरत असतानाच त्यांची ओळख झाली होती. 


दोन दशकांहून अधिकच्या वैवाहित जीवनानंतर बिल गेट्स- मेलिंडा यांच्या नात्याला तडा


दरम्यान, नात्यातून विभक्त झाल्यानंतर आता संपत्तीचा किती भाग मेलिंडा आणि बिल यांच्या नावे जाणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस आणि मॅकेन्झी बेजोस यांनी 2019 मध्ये घटस्फोट घेतला होता. यानंतर मॅकेन्झी स्कॉट यांनी पुन्हा विवाहबंधनात अडकत जीवनाला नवी दिशा दिली होती. त्यांना अॅमेझॉनमधून 4 टक्के भाग मिळाला होता. ज्याची किंमत तब्बल $36 billion इतकी असल्याचं म्हटलं जातं. त्यामुळं आता बिल आणि मेलिंडा यांच्या नात्यात संपत्तीसंदर्भातील निर्णयाकडे अनेकांचं लक्ष आहे.