Nana Patekar : तनुश्री दत्ताच्या आरोपांवर अखेर 6 वर्षांनी नानांनी सोडलं मौन, म्हणाले, 'अचानक येऊन कुणीतरी म्हणतं...'
Nana Patekar : तनुश्री दत्तने नाना पाटेकरांवर केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपवर त्यांनी अखेर भाष्य केलं आहे.
Nana Patekar : अभिनेत्री तनुश्री दत्ताने (Tanushree Dutta) 2018 मध्ये MeToo दरम्यान नाना पाटेकर (Nana Patekar) यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यावर अखेर सहा वर्षांनी नाना पाटेकरांनी भाष्य केलं आहे. तनुश्री दत्ताने 2008मध्ये आलेल्या 'हॉर्न ओके प्लीज' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नाना पाटेकर यांनी तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यावर नाना पाटेकर यांनी नुकतच भाष्य केलं आहे.
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी या आरोपांचं खंडन केलं आहे. तनुश्रीने 2018 मध्ये भारतात MeToo चळवळ सुरू केली, जेव्हा तिने नाना पाटेकर, कोरिओग्राफर गणेश आचार्य आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप केला. त्यावेळी तनुश्रीने म्हटलं होतं की, हॉर्न ओके प्लीज चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. हे गाणे एकाच अभिनेत्यावर शूट करायचे होते, पण तरीही त्या दिवशी नाना पाटेकर सेटवर उपस्थित होते.
नाना पाटेकरांनी काय म्हटलं?
'द लल्लनटॉप'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांनी म्हटलं की, मला माहित होतं की, हे सगळे आरोप खोटे आहेत. म्हणून मला राग नाही आला. जेव्हा सगळं खोटं होतं तेव्हा मला त्या गोष्टीचा राग का यावा? आणि आता या सगळ्या गोष्टी जुन्या आहेत. जे घडून गेलंय, त्याविषयी आपण आता काय बोलणार? सगळ्यांना खरं काय आहे, ते माहित आहे. मुळात मी त्या वेळी काय बोलू शकणार होतो, जेव्हा असं काही घडलंच नव्हतं. अचानक कोणीतरी येऊन म्हणतं की तुम्ही असं केलं आहे, तुम्ही तसं केलं आहे. मी या सगळ्याचं काय उत्तर देणं अपेक्षित होतं? मी काहीच केलं नाहीये, हे मला माहित असताना मी काहीच केलं नाही, असं बोलणं अपेक्षित होतं का?
तनुश्री दत्ताने त्यावेळी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे बराच गोंधळ माजला होता. पण त्यावेळी नाना पाटेकर यांनी या आरोपांवर भाष्य करणं टाळलं होतं. त्यानंतर त्यांनी जवळपास कोणत्याच मुलाखतीमध्ये या घटनेवर भाष्य केलं नाही. त्यामुळे आता नाना पाटेकर यांनी केलेल्या या विधनावर तनुश्री दत्ता काही बोलणार का हे पाहणं गरेजचं ठरेल.