MIFF 2022 : मुंबईत गेले सात दिवस सुरु असलेल्या ‘मिफ्फ-2022’ (MIFF 2022 ) या, माहितीपट,लघुपट आणि अॅनिमेशनपटांना समर्पित, सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा दिमाखदार सोहळ्यात समारोप झाला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ.एल.मुरुगन तसेच सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते पद्मभूषण श्याम बेनेगल हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाचे महासंचालक मनीष देसाई आणि फिल्म्स डिव्हिजनचे व मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर देखील यावेळी उपस्थित होते.


आंतरराष्ट्रीय श्रेणीतील पुरस्कारांचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून अॅलीओना व्हॅन देर होर्स्त यांच्या ‘टर्न युअर बॉडी टु द सन’ या चित्रपटाचा सुवर्णशंख, प्रशस्तीपत्र आणि 10 लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला.


आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा गाजावाजा


या चित्रपट महोत्सवात सादर झालेल्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपटांमधून परीक्षकांनी विजेत्या चित्रपटांची निवड केली. पोलंडच्या कातारझायन अगोपोवीस्ज यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘प्रिन्स इन ए पेस्ट्री शॉप’ या अॅनिमेशनपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन चित्रपटासाठीचा पुरस्कार देण्यात आला. रौप्यशंख, प्रशस्तीपत्र आणि 5 लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार,(45 मिनिटांपर्यंत) रौप्य शंख, भारतातील ‘साक्षात्कारम’ या मल्याळी आणि आणि फारो बेटांवरील ‘ब्रदर ट्रोल’ या लघुपटांना विभागून मिळाला आहे. सुदेश बालन यांनी ‘साक्षात्कारम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून मुंबई आयआयटीने त्याची निर्मिती केली आहे. 


या पुरस्कार वितरण सोहोळ्यात विशेष पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले. यावेळी निकोला पिव्होसन दिग्दर्शित ‘क्लोज्ड टू द लाइट’ या चित्रपटाला प्रमोद पती विशेष परीक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या चित्रपटाला सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि एक लाख रुपये देऊन गौरविण्यात आले.


पडद्यामागील कलाकारांचाही गौरव


यावर्षीच्या पुरस्कारांसाठी राष्ट्रीय परीक्षक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळ यांच्या सदस्यांनी तंत्रज्ञानविषयक श्रेणीतील पुरस्कार संयुक्तपणे देण्याचा निर्णय घेतला. त्या श्रेणीमध्ये सर्वोत्कृष्ट ध्वनी संयोजन, सर्वोत्कृष्ट संकलन तसेच सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीसाठीचे पुरस्कार देखील मुरुगन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. सर्वोत्कृष्ट ध्वनी रचना, सर्वोत्कृष्ट संकलनतसेच सर्वोत्कृष्ट छायाचित्रणासाठी हे पुरस्कार देण्यात आले.


सुप्रसिद्ध चित्रपट निर्माणे श्याम बेनेगल आणि आयडीपीएचे अध्यक्ष रजनी आचार्य यांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाला आयपीडीए पुरस्कार प्रदान करण्यात आला. दादासाहेब फाळके चित्रनगरीचा सर्वोत्कृष्ट पदार्पण-दिग्दर्शनाचा पुरस्कार, भारतातील ‘राधा’ या अॅनिमेशन पटाचे दिग्दर्शक, बिमल पोद्दार यांना देण्यात आला.


राष्ट्रीय स्पर्धा गटांसाठीच्या परीक्षक मंडळाचे अध्यक्ष, संजित नार्वेकर यांनी यावेळी ज्यूरी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून आपले मत मांडले. परीक्षक म्हणून आम्हाला, इथे देशातले सर्वोत्तम माहितीपट, लघुपट, माहितीपट बघण्याची संधी मिळाली. एकूण 67 सिनेमे पहिले. विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे, पहिल्यांदा लघुपट तयार करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाला आहे. माहितीपटांची संख्या कमी होती अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सिनेमांची संख्या केवळ पांच होती, हे निराशाजनक होते, असे सांगत ती वाढवायला हवी असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांच्या चित्रपटासाठी वेगळा विभाग पूर्वी होता, तो पुन्हा सुरु करायला हवा, अशी सूचना त्यांनी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला, मिफ्फचे संचालक रविंद्र भाकर यांनी  या महोत्सवाची माहिती देणारा अहवाल उपस्थितांसमोर सादर केला.


‘गान कोकिळा’ लता मंगेशकर यांना वाहिली श्रद्धांजली


कोरोना महामारीनंतरचा हा पहिला महोत्सव संपन्न झाला आणि तो खरोखरच यशस्वीपणे पार पडला, अशा शब्दांत भाकर यांनी समाधान व्यक्त केले. या महोत्सवाचे यश म्हणजे, भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीला दिलेली मानवंदना असल्याचे ते म्हणाले. माहितीपटांच्या बाजारपेठेसाठी एक अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षीच्या हायब्रिड महोत्सवात जवळपास 380 चित्रपट दाखवण्यात आले. ‘गान कोकिळा’ लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी यावेळी नॉर्दन लाईट्स या कलापथकातर्फे रंगमंचावर नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.


हेही वाचा :