Beed News : बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी गेवराईचे भाजपचे आमदार लक्ष्मण पवार (BJP MLA laxman Pawar) यांनी जिल्हा प्रशासनाकडे करूनही यावर कारवाई होत नसल्याने आमदार पवार यांनी गेवराई तालुक्यातील गंगावाडी या गावात गोदावरी नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं. आमदार पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात गावातील महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या आणि तब्बल पाच तास ग्रामस्थांनी आमदार पाण्यात उभे होते
बनावट ठरावावर सरपंच यांच्या सह्या असल्याचा आरोप
गेवराई तालुक्यातील गंगावाडी याठिकाणी महसुल प्रशासनाच्या वतीने वाळू घाटाला परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र ज्या ठिकाणी हा वाळू घाट मंजूर झाला, त्याऐवजी दुसऱ्याच ठिकाणावरून वाळू उपसा सुरू असून वाळू ठेका मिळवण्यासाठी बनावट ठरावावर सरपंच यांच्या सह्या असल्याचे आरोप करत गावकर्यांनी गावातच वाळू माफियांच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केलं होतं. दोन दिवसांपूर्वी याच आंदोलकांची भेट घेऊन आमदार पवार यांनी हे उपोषण मागे घ्यायला लावलं. मात्र दोन दिवस उलटून देखील प्रशासनाच्या वतीने या वाळू ठेक्यावर कुठलीच कारवाई न झाल्याने आज थेट आमदारच या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते
...तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरूच राहणार
जोपर्यंत या वाळू ठेक्यावर कारवाई होत नाही किंवा तसे आदेश जिल्हाधिकारी देत नाहीत, तोपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका ग्रामस्थांनी आमदार पवार यांनी घेतली होती. त्यामुळे अगदी सकाळपासूनच गंगावाडी च्या गोदापात्रात मध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त आणि महसूलचे कर्मचारी दाखल झाले होते. तहासिलदारानी विनंती करून देखील आमदारांनी हे आंदोलन सुरूच ठेवल्याने प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
जिल्हाधिकाऱ्यांना आंदोलनस्थळी यावं लागलं
शेवटी चार तास सुरू असलेलं हे आंदोलन सोडवण्यासाठी शेवटी स्वतः बीडचे जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांना या आंदोलनस्थळी यावं लागलं. जिल्हाधिकारी यांनी स्वतः या ठिकाणी येऊन आमदार पवार आणि ग्रामस्थांना समाधानकारक आश्वासन दिल्यानंतर हे जलसमाधी आंदोलन मागे घेण्यात आलं असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून गंगावाडी येथे सुरू असलेल्या वाळू ठेक्याची चौकशी करण्यासाठी एक समितीची गठीत करण्यात आली आहे. गोदावरी नदीपात्रातून होणाऱ्या अवैध वाळू उपशामुळे आतापर्यंत अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे त्यामुळे या वाळूमाफिया वर कारवाई करण्यासाठी आमदार पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे