Mahesh Kothare : महेश कोठारे (Mahesh Kothare) दिग्दर्शित झपाटलेला हा सिनेमा प्रेक्षकांना आजही तितकाच आवडतो. या सिनेमातल्या तात्या विंचूवर आजही तेवढंच प्रेम केलं जातं. दिलीप प्रभावळकरांनी तात्या विंचू ही व्यक्तिरेखा साकारली होती. पण तात्या विंचू हा बाहुला जास्त पसंतीस उतरला. त्यानंतर या सिनेमाचा दुसरा भागही भेटीस आला तर आता तिसऱ्या भागाच्या शुटींगलाही सुरुवात झाल्याचं सांगितलं जात आहे. पण झपाटलेला या सिनेमाचा लंडनमध्ये जेव्हा प्रिमिअर झाला त्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) महेश कोठारेंना मदत केली होती. 


झपाटलेला सिनेमा जेव्हा गाजला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी फार मोलाची मदत केल्याचं महेश कोठारे यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे त्याचा लंडनमध्ये प्रिमिअर करण्यासाठी शरद पवारांनी आर्थिक सहकार्य केलं होतं, त्यामुळे शरद पवारांमुळे तात्या विंचू लंडनला पोहचल्याचं महेश कोठारे यांनी स्पष्ट केलं. 


झपाटलेलाचा लंडनमध्ये प्रिमिअर


लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश कोठारेंनी हा किस्सा सांगितला. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, माझा झपाटलेला जेव्हा आला, तेव्हा माझी अशी इच्छा होती की मराठीतला पहिला सिनेमा आपण परदेशात रिलीज करायचा. कारण चित्रपट गाजला होता, लोकांना खूप आवडला होता. त्यात लंडनमध्ये बरीच मराठी माणसं आहेत, त्यामुळे मला तो तिथे रिलीज करायचा होता. तेव्हा आम्ही लंडनला गेलो होतो, संपूर्ण फॅमिली गेलो होतो. तेव्हा तिथे या सिनेमाचा प्रमिअर करता येईल का? याचा देखील विचार केला.'


'लंडनमध्ये माझा चुलत चुलत भाऊ राहत होता, मधुकर कोठारे आणि त्याची बायको शिला कोठारे ही तिथे ती मराठी महामंडळाची अध्यक्ष का सेक्रेटरी होती. आम्ही तिकडे गेल्यावर त्यांच्या पुढ्यात मी ती इच्छा व्यक्त केली. ती म्हणाली की  मस्त कल्पना आहे, आपण इथे प्रमिअर करु. त्यानंतर तिने मराठी लोकांमध्ये त्याची जाहिरात केली.  तिने सगळ्या माध्यमातून त्याविषयी तिथल्या लोकांना माहिती दिली. पुढे काही घडण्याआधीच लंडनमधला तो शो हाऊसफुल्ल झाला होता', असं महेश कोठारे यांनी म्हटलं.


शरद पवारांमुळे झपाटलेला लंडनला पोहचला


पुढे त्यांनी म्हटलं की, 'त्यावेळी 13 फेब्रुवारी 1994 ला आम्ही त्या सिनेमाचा प्रमिअर केला. त्यामुळे लंडनाला मला पुन्हा जायचं होतं.पण जायचं म्हणजे खर्च करावा लागणार होता. कसं करायचं विचार सुरु होता. माझी एक चुलत बहिण आहे, तिच्या मिस्टरांचे शरद पवारांसोबत चांगली ओळख होती. माझीही होती, पण त्याची जरा जास्त ओळख होती. म्हणून तो मला शरद पवारांकडे घेऊन गेला. तेव्हा ते फार व्यस्त होते, कारण नुकतेच ते मुख्यमंत्री झाले होते. त्यावेळी बॉम्बब्लास्ट झाले होते, त्यामुळे त्यांना इथे मुख्यमंत्री म्हणून आणलं होतं. बऱ्याच त्यांच्या भेटीगाठी सुरु होत्या. त्यांच्याकडे खूप गर्दी होती. त्यांनी मला त्यातूनही बोलावलं आणि मला म्हणाले तुझं काय आहे लवकर सांग माझ्याकडे जास्त वेळ नाहीये.' 


मी त्यांना सांगितलं असं असा लंडनला प्रमिअर करतोय, मी आताच जाऊन आलोय, त्यामुळे पुन्हा जायला तेवढे फंड्स नाहीयेत. त्यावर ते मला म्हणाले की, ओके मला कळालं, ही फाईल राहू दे इकडे, तू जा. मग मी गपचूप तिथून बाहेर आलो, होईल की नाही होणार ही श्वाश्वती नव्हती. पण दोन दिवसांत मला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून फोन आला की तुमचा चेक तयार आहे, येऊन तो घेऊन जा. तेव्हा मी पेपरमध्ये त्याची जाहिरात देखील दिली होती. त्यात लिहिलं होतं, माननीय मुख्यमंत्री शरद पवार यांच्या आशिर्वादाने तात्या विंचू निघाला लंडनला, असा किस्सा महेश कोठारे यांनी सांगितला. 



ही बातमी वाचा : 


Munjya Box Office Collection Day 2:  बॉलीवूडच्या शर्यतीत बॉक्स ऑफिसवर मराठी दिग्दर्शकाची दमदार सुरुवात, दुसऱ्या दिवशीही मुंज्याची कोट्यावधींची कमाई