Lata Mangeshkar Death News: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे. लता मंगेशकर यांचं ब्रीच कॅंडी रुग्णालयात सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झालं. दुपारी 12.30 ते 3 वाजेपर्यंत प्रभूकुंज इथं अंतिम दर्शनासाठी लतादीदींचं पार्थिव ठेवलं जाणार आहे. सायंकाळी साडेसहा शिवाजी पार्क इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 


लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा


केंद्र सरकारकडून दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. राष्ट्रध्वज तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. लतादीदींवर संपूर्णपणे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या अंत्यदर्शनाकरता जशी व्यवस्था शिवाजी पार्कवर करण्यात आली होती. त्याप्रमाणेच शिवाजी पार्कवरच लतादीदींच्या अंत्यदर्शनाकरता व्यवस्था होणार असल्याची माहिती आहे. महापालिका थोड्या वेळात शिवाजी पार्कात स्टेज उभारणार आहे. अंतिमविधी शिवाजी पार्क स्माशानभूमी येथे होणार आहे. 







संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ


कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.


लतादीदींच्या निधनावर विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. 


भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
 
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.  


संबंधित इतर बातम्या


Lata Mangeshkar : 20 भाषांमध्ये तब्बल 30 हजारांहून अधिक गाणी, लता मंगेशकरांचा सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम!


Lata Mangeshkar passes away : युग संपले! लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट


Lata Mangeshkar Death : गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 


Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड