Remembering Lata Mangeshkar LIVE: स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड
Lata Mangeshkar Death LIVE Updates: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
राज्य सरकारने भारताच्या गानकोकिळा, भारतरत्न स्व. लता मंगेशकर (दीदी )यांच्या निधनानिमित्त 3 दिवसीय राज्य दुखवटा जाहीर केला आहे, त्यामध्ये मुंबई डब्बावाला संघटना सहभागी आहे. त्यामुळे उद्या सोमवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2022 रोजी डब्बे व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. व त्यामार्फत ताईंना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. याची सर्व डब्बेवाला कामगारांनी नोंद घ्यावी.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यानेही लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली असून त्याबद्दलचं ट्वीट केलं आहे.
शिवाजी पार्कवर गीताअध्याय पठण सुरु, थोड्याच वेळात अंतसंस्कार होणार आहे.
सैन्यदलाकडून लतादीदींना मानवंदना
लता दीदींसाठी शाहरुखनं नमाज केली अदा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवाजी पार्क येथे उपस्थित राहून लतादीदींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले, तसेच लतादीदींना श्रध्दांजली वाहिली.
लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेद्र मोदी शिवाजी पार्कवर पोहचले.
लगा मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी अनेकांनी शिवाजी पार्कवर उपस्थिती दर्शवली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,
शरद पवार,
सचिन तेंडुलकर,
सुप्रिया सुळे,
राज ठाकरे,
जावेद अख्तर,
छगन भुजबळ,
अजित पवार,
दिलीप पळसे पाटील,
शाहरुख खान,
श्रृद्धा कपूर,
देवेंद्र फडणवीस,
विनोद तावडे,
पियुष गोयल,
अनिल देसाई
लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन तेंडुलकर, शाहरुख खान शिवाजी पार्कवर दाखल.
शिवाजी पार्क परिसरात प्रचंड गर्दी होण्याची शक्यता, वरळी, प्रभादेवीतला जनसमुदाय पार्थिवासोबत चालत निघाला आहे
पाकिस्तानातील सर्व चॅनेल्ससह जागतिक पातळीवरील 43 देशांत लता मंगेशकर यांच्या अंत्ययात्रेच live सुरू आहे.
Lata Mangeshkar Last Rites : लतादीदींच्या अंतयात्रेला सुरुवात झाली आहे. त्यांचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी झाली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांनी साठच्या दशकात नागपुरात घडलेल्या एका कटू प्रसंगानंतर जणू नागपुरात न येण्याची शपथच घेतली होती... पण नंतर नागपूरकरांनी त्यांची ती नाराजी दूर करत १९ नोव्हेंबर १९९६ रोजी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर त्यांचा नागरी सत्कार घेतल्याची आठवण नागपूर महापालिकेच्या तत्कालीन महापौर कुंदाताई विजयकर यांनी सांगितली. तेव्हाचा सत्कार सोहळा भव्य दिव्य तर राहिलाच होता... मात्र, त्या सत्कार सोहळ्यात नागपूरचे सर्वपक्षीय नेते आणि विचारवंत आवर्जून उपस्थित होते... कार्यक्रमात लता दीदींनी गाणं गाव अशी प्रेक्षकांची इच्छा होती. पण सत्कार मूर्तीनाच गाणं गा कसं म्हणायचे असा प्रश्न आयोजकांना पडला होता. मात्र, साठच्या दशकात घडलेल्या कटू प्रसंगानंतर नागपूरकरांवर नाराज असलेल्या लता दीदींनी श्रोत्यांसाठी पसायदान गायले होते अशी आठवण ही माजी महापौर कुंदाताईं यांनी सांगितली.
या नागरी सत्कार सोहळ्यानंतर लता मंगेशकर यांच्याशी विजयकर कुटुंबीयांचे स्नेहबंध नेहमीसाठी जुळले... नंतरच्या काळात जेव्हा जेव्हा लता दीदी नागपुरात यायच्या तेव्हा त्या विजयकर यांच्याकडे आवर्जून यायच्या... कुंदाताई विजयकरसोबत फ़िरायला जाणे, बाजारात जाऊन साड्या खरेदी करणे दीदींना आवडायचे.. दीदींनी नागपुरात साड्या खरेदी करण्याच्या अनेक आठवणी असल्याच्या ही कुंदाताई म्हणाल्या... एकदा नागपुरातील एका हॉटेल मधून घरापर्यंत कुंदाताई यांनी स्वतः कार चालवत लता मंगेशकर यांना घरी आणले होते. कारमध्ये एवढी मोठी व्यक्ती बसल्याने कार चालवताना जीवात जीव नसल्याची आठवण ही कुंदाताई यांनी सांगितली.
लतादीदींचं अखेरचं दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीवरुन रवाना झाले आहेत. थोड्याच वेळात ते मुंबईत दाखल होणार आहेत. ५.१५ मिनिटांनी उद्धव ठाकरे शिवाजी पार्क पोहचणार तिकडे पंतप्रधान नरेद्र मोदींना रिसिव्ह करणार आहेत.
प्रभूकुंज निवसस्थानाबाहेर पोलिसांकडून तलादीदींना मानवंदना
Lata Mangeshkwar Passes Away : भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
बिग बी अमिताभ बच्चन मुलगी श्वेतासह लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी पोहोचले
मुंबईचे पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी लतादीदींच्या शिवाजी पार्कवरील अंत्यविधीच्या व्यवस्थेची पाहणी करत आढावा घेतला. त्यांनी माहिती दिली की, मैदानाच्या मधोमध दोन लहान स्टेज उभारण्यात आले आहेत. एका स्टेजवर लतादिदींचं पार्थिव वातानुकुलित शवपेटीत ठेवण्यात येईल. इथे व्हिव्हिआयपींचं अंतीम दर्शन होईल. दुसऱ्या स्टेजवर लतादीदींच्या कारकिर्दी आणि आठवणींना उजाळा देणारी छायाचित्रे असतील. तिसऱ्या टप्प्यावर चिता रचली जाईल आणि अंतीम विधी पार पडतील.
मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आज संगीताचे सूर हरपले असून संगीताचा आवाज लोपला आहे, त्यामुळे प्रत्येक चाहता आज नि:शब्द आहे, या शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. तीन पिढ्यांशी समरस झालेल्या लतादीदी या ईश्वराची देण होत्या, त्या पुन्हा होणे नाही. "मेरी आवाज ही पहचान है", हे त्यांचे शब्द अजरामर ठरणार आहेत. संगीत क्षेत्राला एका वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या लतादीदींच्या जाण्याने देशाची मोठी हानी झाली आहे असे सांगून मंत्री अशोक चव्हाण यांनी लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ता मंगेशकर यांचे पार्थिव ब्रीच कॅण्डी रुग्णालयातून 'प्रभूकुंज' या निवासस्थानी दाखल झाले आहे. लता मंगेशकरांच्या अंत्यदर्शनासाठी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लतादीदींच्या निधनामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आपल्या नियोजित वेळेपूर्वी पावणे बारा वाजता मुंबईकडे रवाना झाले आहेत. नागपुरात थांबलेल्या राज्यपालांची मुंबईला निघायची नियोजित वेळ दुपारी तीन वाजताची होती.
Lata Mangeshkar: लता मंगेशकर त्यांच्या गाण्याद्वारे आमच्यासोबत असतील : Prakash Javdekar
Lata Mangeshkar Passed Away: तुमसा जहाॅं में कोई नही दीदी- पद्मजा फेणाणी ABP Majha
अहमदनगर - लतादिदींच्या जाण्यामुळे भारताचे सर्वात मोठे वैभव काळाच्या पडद्याआड गेले आहे. गाणारे लोक अनेक आहेत पण लतादिदींसारखा आवाज, गाण्यातील भाव आणि संदेश हे दुर्मिळ आहे. अशी भावना समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली. लता दीदींनी गायिलेली भक्तीगीते, भावगीते व देशभक्तीपर गीते ही सामान्य माणसांना आनंद आणि प्रेरणा देणारी होती. वेगवेगळ्या क्षेत्रात कष्ट करणाऱ्या श्रमिकांनी थकल्यानंतर लतादिदींचे गाणे ऐकले किंवा त्यांचा आवाज कानावर पडला की, क्षणात श्रमपरिहार होत असे. लतादिदींच्या हस्ते मिळालेला जीवन गौरव पुरस्कार हा जीवनातील सर्वाधिक आनंदाचा क्षण होता, असे अण्णांनी म्हटले आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. ते लतादींदींच्या अंत्यसंस्काराच्या तयारीचा आढावा घेत आहेत. शिवाजी पार्कवर लतादीदी यांचे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने स्वर्गीय सुरांचे स्वर्णिम पर्व संपले, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ''आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे,'' अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदी यांच्या अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणार, 4 वाजता मुंबईत दाखल होणार
आपल्या स्वर्गीय स्वरांनी भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध करणा-या गानकोकीळा, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त सुन्न करणारे आहे. आपल्या सुमधूर आवाजाने त्यांनी संपूर्ण जगातील रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक स्वर्णिम पर्व संपले आहे अशा शब्दांत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
लता मंगेशकर यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करून नाना पटोले म्हणाले की, लता दीदींच्या आवाजात जादू होती, असा आवाज शतकात एखाद्यालाच लाभतो. वडील दीनानाथ मंगेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गायनाला सुरुवात केली होती. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी पहिले गाणे गायले होते. आपल्या ७८ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत लतादीदींनी हिंदी, मराठीसह २० भाषांमधील २५ हजारांहून अधिक गितांना आवाज दिला. आनंदघन नावाने त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले होते. संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न पुरस्कारासह जगभरातील अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. लतादीदी ह्या फक्त महाराष्ट्राचेच नाही तर देशाच्या भूषण होत्या. त्यांच्या निधनाने संगीत आणि सांस्कृतीक क्षेत्राची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे. आज त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी आपल्या गाण्यांच्या माध्यमातून त्या चिरकाल स्मरणात राहतील.
लतादीदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मुंबई : लतादिदी आज आपल्यात नाहीत ही कल्पनाच सहन होत नाही. बाळासाहेबांनंतर त्या जणू आमच्या आधारच होत्या, सगळ्या सुख दुःखाच्या क्षणी आवर्जून पाठीशी राहणाऱ्या दिदींच्या जाण्यानं आमच्या परिवारावर मोठा आघात झाला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाळासाहेब असतांना आणि नंतर देखील लतादिदी ठाकरे परिवाराचा एक अविभाज्य भाग होत्या. प्रसंग कुठलाही असो, दिदींचा फोन नेहमी असायचा. त्यांनी अनेक प्रसंगात आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. एक वडीलधारी व्यक्ती म्हणून सतत पाठीशी उभ्या राहणाऱ्या दिदी आज आपल्यात नाहीत, माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी लतादीदींना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करते म्हटले आहे की, ''भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे निधन झाल्याचे कळून खूप दुःख झाले. आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी विविध भाषांमध्ये आपल्या सुमधुर सादरीकरणाने प्रत्येक भारतीयाच्या हृदयाला स्पर्श केला आहे. आम्ही त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांप्रती मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो.''
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''लताजींचे निधन माझ्यासाठी हृदयद्रावक आहे, जसे जगभरातील लाखो लोकांसाठी. भारतरत्न, लताजींचे कर्तृत्व अतुलनीय राहील.''
मुंबई - जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील असे सांगतानाच शरद पवार यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
‘मला जर एखाद्यांने विचारलं की, आकाशात देव आहे का?, तर मी सांगेन देव आहे की नाही मला माहित नाही. मात्र ह्या आकाशात सुर्य आहे, चंद्र आहे आणि 'लताचा स्वर' आहे.दिवस रात्र अशी कुठलीही वेळ नाही, क्षण नाही की लताचा स्वर या जगात कुठून तरी कुठे जात असतो.' पु.ल. देशपांडे
दक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी यांनी लतादीदींच्या जाण्यावर शोक व्यक्त केला आहे. चिरंजिवी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, ''भारताची गानकोकिळा... लतादीदी महान व्यक्तिमत्वांपैकी एक...लता दीदी आता आपल्यात नाहीत. त्यांच्या जाण्याने न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा जीवनप्रवास विलक्षण होता. त्यांचा आवाज आणि गाणं कायम मनात स्थान करुन राहील.''
माजी क्रिकेटपटू विरेंद्र सहवाग यांनीही लतादीदींना श्रद्धांजली दिली आहे. सहवाग यांनी ट्विट केलं आहे की, ''द नाईटिंगेल ऑफ इंडिया, एक आवाज ज्याने जगभरातील लाखो लोकांना आनंद दिला. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांसाठी मनःपूर्वक संवेदना. ओम शांती...''
मुंबई, दि. 22 :- “‘अजीब दास्ताँ है ये.... कहाँ शुरु कहाँ खतम्, ये मंजिलें हैं कौनसी... ? ना वो समझ सके, ना हम...’ सारख्या हजारो सूरमधुर गाण्यांनी कोट्यवधी रसिकांच्या हृदयसिंहासनावर आठ दशकांहून अधिक काळ अधिराज्य करणाऱ्या स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर हे भारतीयंच नव्हे तर, जागतिक संगीत विश्वाला पडलेलं अद्भूत स्वप्न होतं. लतादिदींच्या निधनानं ते स्वप्न आज भंगलं आहे. संगीतविश्वातला स्वर्गीय सूर हरपला आहे. लतादिदींच्या सुरेल सूरांनी रसिकांचं भावविश्व आणि देशाचं कलाक्षेत्र समृद्ध केलं. जाण्यानं महाराष्ट्रातला, देशातला प्रत्येक जण, प्रत्येक घर आज शोकाकूल आहे. स्वर्गीय आनंद देणारी लतादिदींची गाणी, त्यांचे दैवी सूर हे आकाशात सूर्य-चंद्र असेपर्यंत राहतील, परंतु लतादिदी आपल्यात नसतील, ही कल्पना सहन होत नाही. लतादिदी जगात एकमेव होत्या. त्यांच्यासारखी गानकोकीळा पुन्हा होणे नाही... अशा लतादिदी आता पुन्हा होणे नाही...” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गानकोकीळा, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लता मंगशेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
“लतादिदी अमर आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ कधीच येणार नाही हा भाबडा समज आज खोटा ठरला आहे,” असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या मातीला संगीतकलेचा गौरवशाली वारसा आहे. महाराष्ट्राच्या मातीत अनेक दिग्गज गायक, संगीतकार जन्मले. परंतु पंडित दिनानाथ मंगेशकरांच्या पोटी जन्मलेल्या लतादिदींनी भारतीय संगीत क्षेत्रात चमत्कार घडवला. अठ्ठावीस सूरांच्या दुनियेत लीलया संचार करणाऱ्या लतादिदींनी आठ दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत एकापेक्षा एक सरस गाणी दिली. संगीतक्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळवलं. ‘आद्वितीय’ अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. भारतीय, जागतिक संगीतक्षेत्र समृद्ध केलं. देव आणि स्वर्ग आहेत की नाही ते माहित नाही, परंतु लतादिदींमध्ये अनेकांनी देव पाहिला. त्यांच्या सूरांनी रसिकांना स्वर्गीय आनंदाची अनुभुती दिली. लतादिदींनी सामाजिक बांधिलकीही जाणीवपूर्वक जपली. 1962 च्या चीनविरुद्धच्या युद्धात शहिद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ त्यांनी गायलेल्या ‘मेरे वतन के लोगो...’ गाण्यानं तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुजींच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पंडित दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेच्या क्षेत्रातलं त्यांचं योगदान कायम स्मरणात राहील. विश्वरत्न, भारतरत्न, महाराष्ट्रभूषण लतादिदी महाराष्ट्रकन्या होत्या. त्यांचं निधन ही महाराष्ट्राची, देशाची फार मोठी हानी आहे. लतादिदींचं नसणं कायम सलत राहील, मात्र त्यांची गाणी आपल्याला सदैव त्यांची आठवण देत राहतील. मी लतादिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दु:खद प्रसंगात मी आणि संपूर्ण महाराष्ट्र मंगेशकर कुटुंबियांसोबत आहे. आम्ही सर्वजण त्यांच्या दु:खात सहभागी आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत लतादिदींना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुंबई, दि. ६ :- लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून देहाने नाहीशा झाल्या. हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. अनादि आनंदघन म्हणून त्या स्वर अंबरातून आपल्यावर स्वरअमृत शिंपीत राहतील, अशा शोकमग्न भावनांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या लाडक्या लतादिदी आज आपल्यात नाहीयेत, हे सून्न करणारं आहे. पण त्या स्वरांनी, सुरेल गाण्यांनी, चिरपरिचित आवाजाने त्या अजरामर आहेत आणि राहतील. आपल्या आयुष्यातील जवळपास सर्वच प्रसंग,क्षण लतादिदींनी आपल्या सुमधुर सुरावटींनी जिवंत केले आहेत. त्यांच्या स्वरांनी मंगल क्षण सजले. दुःखद क्षणी याच स्वरांनी सगळ्यांच्या मनाचा ठाव घेतला. लढाई, संघर्षात याच स्वरांनी उर्मी,स्फुर्ती जागवली. जगाचा क्वचितच एखादा कोपरा असेल,जिथे त्यांचा स्वर पोचला नसेल, ऐकला गेला नसेल. भाषा, सीमा-प्रांत, वंश-धर्म असे अनेक बंध तोडून त्यांच्या स्वरांचाच एक प्रदेश, भवताल निर्माण झाला आहे.
ठाकरे आणि मंगेशकर कुटुंबियांचे जुने स्नेहबंध आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे लतादीदी, हृदयनाथ, आशाताई यांच्यासह सर्वांशीच जिव्हाळ्याचे नाते राहिले आहे. त्या निष्णात छायाचित्रकार होत्या. उत्तम कॅमेरे, वेगवेगळ्या लेन्सेस यांचा त्यांचा अभ्यास होता. त्यांच्याशी मध्यंतरी कधीमधी फोटोग्राफी, कॅमेरे याबाबत चर्चा व्हायची. माझ्या दोन्ही छायाचित्र संग्रहांविषयी त्यांनी आवर्जून दाद दिली होती. काही निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी, काही कारणांनी चौकशी करण्यासाठी, त्यांचा फोन येत असे. मध्यंतरी मी रुग्णालयात असतांना त्या सातत्याने माझी विचारपूस करून आशीर्वाद देत असत. त्यांचा तो आपुलकीचा सुमधुर स्वर आता पुन्हा कानी पडणार नाही. त्यांचा तो स्वर हे आमच्यासाठी परमसौख्य होते. हे सौख्य नियतीने हिरावून घेतले आहे. ही त्यांची उणीव जाणवत राहील.
लतादिदींचे जाणे केवळ मंगेशकर कुटुंबियांवरच नव्हे तर त्यांच्या करोडो रसिक चाहत्यांवर आघात आहे. कुणी कुणाचं सांत्वन करायचं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळल्याची भावना आहे.
लता दीदी जरी आज आपल्यात नसल्या तरी त्यांनी गायलेली गीते आपल्यात कायम राहतील. मला आठवतंय की एक वेळ होती, जेव्हा सकाळी रेडिओ ऑन करून दिदींच्या आवाजाने अनेकांच्या दिवसाची सुरुवात व्हायची. त्यांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगो' या गीताने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत.
ज्या आवाजाने संपूर्ण जगाला मंत्रमुग्ध केले, ते स्वर आणि सूर आता दिदींच्या स्मृती सदैव तेवत ठेवेल. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माझ्या परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
लतादीदी मंगेशकर यांच्या निधनाने केवळ स्वर नाही, तर भारतीय संगीताचा आत्मा हरपला आहे.
भारतीय संगीताचे हे दैवत आज आपल्यात नाही, ही कल्पनाच करवत नाही.
ईश्वराने भारताला दिलेली अमूल्य देणगी हिरावून घेतली आहे.
आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक हरपला आहे.
‘ऐ मेरे वतन के लोगो’तून प्रत्येकाच्या अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचे सामर्थ्य जसे त्यांच्या सुरांमध्ये होते, तसेच अनेकांच्या आयुष्यातील स्वप्नांना आणखी उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याचे काम लतादिदींच्या सुरांनी केले. वृद्ध असो की तरुण लतादीदींच्या सुरात रममाण न होणारा विरळाच!
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निस्सिम भक्ती आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी जपली. वीर सावरकरांच्या विचारांची तन-मन-धनाने सेवा करण्याचे काम लतादीदींनी केले. प्रखर राष्ट्रवाद जपणारे हे संपूर्ण मंगेशकर कुटुंब लतादीदींनी कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून जपले.
त्यांची विविध कार्यक्रमांमध्ये अनेकदा भेट व्हायची. प्रत्येकवेळी आपुलकीने विचारपूस असायची. भेट झाली नाही, तर फोन करून ‘कसा आहेस देवेंद्र’ हे शब्द मोठ्या बहिणीची उणिव भरून काढणारे असायचे. त्यांचे जाणे, ही माझी सुद्धा वैयक्तिक आणि मोठी हानी आहे.
लतादीदींचे स्वर हे कायम आपल्यासोबत राहणार आहेत, हेच सांगत स्वत:ची समजुत करून घ्यायची, एवढेच आता आपल्या हाती आहे.
त्या स्वर्गातूनही सुरांची बरसात नक्कीच करतील.
भारतरत्न लतादीदींना माझी भावपूर्ण श्रद्धांजली!
मंगेशकर कुटुंबीय, संपूर्ण भारतवासियांच्या दु:खात मी सहभागी आहे.
- देवेंद्र फडणवीस
लता दीदी नावाच्या युगाचा अंत झाला, जगाच्या पटलावर हिंदुस्थानचे वैभव लता दीदी होत्या
लता दिदींचे जाणे अत्यंत वेदनादायी, दुःखद आहे, आता केवळ लता दिदींच्या आवाजा सोबत राहावे लागेल
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते विधानपरिषद
"त्यांच्या स्वरात ईश्वराला जागवण्याची व तान्हुल्यांना निजवण्याची जादू होती" : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
"लतादीदींनी भारतीय संगीत समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले"
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महान पार्श्वगायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन ही देशातील प्रत्येक कुटुंबाकरिता दुःखद बातमी आहे. हा दिवस अटळ आहे हे माहिती असून देखील हा दिवस येऊच नये असे वाटत होते.
भारतरत्न लता मंगेशकर यांचे संगीत देश, भाषा व काळ यांच्या सीमा उल्लंघून थेट अंतरात्म्याला जागवणारे होते.
आपल्या भावगीतांनी ईश्वराला जागविण्याची, प्रेमगीतांनी तरुणाईला खुलवण्याची, देशभक्तीपर गीतांनी जवानांना स्फुरण देण्याची तर प्रेमळ अंगाईगीतांनी तान्हुल्यांना निजविण्याची अद्भुत जादू त्यांच्या स्वरात होती.
अभिजात भारतीय संगीत सुलभ करून लतादीदींनी ते समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचविले. आपल्या दैवी स्वरांनी त्यांनी असंख्य जनसामान्य, शेतकरी तसेच कष्टकरी लोकांना सकारात्मक जीवन जगण्याची नित्यनवी उमेद, ऊर्जा व उत्साह दिला.
लतादीदी या तब्बल आठ दशके भारतीय चित्रपट सृष्टीची ओळख होत्या. चित्रपट व संगीत सृष्टीच्या सुवर्ण काळातील साक्षात हिरकणी होत्या.
भारतरत्न लतादीदी महाराष्ट्राच्या कन्या होत्या याचा संपूर्ण महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. त्या आपल्या जीवनकाळात झाल्या हे आपले सद्भाग्य होते.
लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील देव्हारा रिकामा झाला आहे. त्यांचा दैवी स्वरदीप मात्र मनामनात तेवतच राहील.
या दुःखद प्रसंगी संपूर्ण राज्याच्या वतीने लतादीदींना आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना आशाताई, उषाताई, मीनाताई, पं. हृदयनाथ तसेच संपूर्ण मंगेशकर कुटुंबियांना कळवतो.
लतादीदींच्या देशविदेशातील करोडो चाहत्यांना देखील आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
मी शब्दांच्या पलीकडे व्यथित आहे. दयाळू लता दीदी आम्हाला सोडून गेल्या. त्यांच्या निधनानं आपल्या देशात एक पोकळी निर्माण झाली आहे जी भरली जाऊ शकत नाही. येणाऱ्या पिढ्या त्याचं भारतीय संस्कृतीतील एक मोठं नाव म्हणून स्मरण ठेवतील, लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती- पंतप्रधान मोदी
लतादीदींच्या निधनानं संगीत क्षेत्रासह देशाचं मोठं नुकसान- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
Lata Mangeshkar Death News: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
पार्श्वभूमी
Lata Mangeshkar Death News: गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 92 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यामुळे लता मंगेशकर यांना 9 जानेवारीच्या रात्री मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यानंतर 30 जानेवारीला लता मंगेशकर या कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांचे निधन झाले. भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गेल्या 29 दिवसांपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयातील (Breach Candy Hospital)आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र, दुर्दैवाने आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर संगीत क्षेत्रासह विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होताना दिसत आहे.
भारतरत्नसह विविध पुरस्कारांनी सन्मान
लता मंगेशकर यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी अनेकांना प्रार्थना केली होती. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना गानकोकीळा म्हणून ओळखलं जातं. त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक आहेत. त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखलं जातं. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केलं आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना 'भारत रत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना 1989 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला.
92 वर्षीय लता मंगेशकर यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकरणीला कोरोनाची लागण झाल्यानंतर लता दीदींचीही कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना त्यांच्या घराजवळील अर्थात 'प्रभू कुंज' येथील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधीही अनेकदा त्यांनी या रुग्णालयात उपचार घेतले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -