काही नाती वेळेत निभावता आली नाहीत ..रीलस्टार प्रथमेशच्या निधनानंतर कोकण हार्टेड गर्लची भावूक पोस्ट,म्हणाली ..
तो अनेक दिवसांपासून आजारी होता. अनेक चाहत्यांसह कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी जाहीर केली आहे.

Ankita Walavalkar Emotional Post on Reelstar Prathamesh Kadam death : मराठमोळा रियल स्टार आणि इन्फ्लुएन्सर प्रथमेश कदमचे निधन झाल्यानंतर संपूर्ण मनोरंजनसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रथमेश कदम आणि त्याची आई प्रज्ञा कदम यांचे मायलेखाचे रिल्स सोशल मीडियावर विशेष चर्चेत असायचे. प्रथमेशच्या अचानक जाण्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो अनेक दिवसांपासून आजारी होता. अनेक चाहत्यांसह कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही दुःखद बातमी जाहीर केली आहे. दरम्यान कोकण हार्टेड गर्ल उर्फ अभिनेत्री अंकिता वालावलकरने प्रथमेशसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. ' तू अनेकदा तुझ्या घरी बोलावलं. पण मला येणं कधीही जमलं नाही. आज तुझ्या अंत्यदर्शनाला घरी आले. काही नाती वेळेत निभावता आली नाहीत असं म्हणत अंकितानं खंत व्यक्त केलीय.
प्रथमेशच्या निधनाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी प्रथमेशच्या जवळच्या मित्राने तन्मय पाटेकर यांनी इंस्टाग्रामवर' देवाघरी स्वतःची काळजी घे रे, तुझी खुप आठवण येईल. मिस यु भाई' असं म्हणत निधन झाल्याची पोस्ट केली होती. त्यानंतर मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकार त्याच्या दुःखात सहभागी झाले आहेत.
काय म्हणाली अंकिता वालावलकर ?
सोशल मीडियावर आपल्या आई आणि बहिणीसोबत प्रथमेश कदमचे अनेक व्हिडिओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होते. त्याच्या अचानक निघून जाण्याने अनेकांना धक्का बसलाय. प्रथमेशच्या निधनानंतर बिग बॉस फ्रेम अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर प्रथमेशला उद्देशून एक पोस्ट केली आहे. ती म्हणाली " प्रथमेश आज तुझ्या अंतदर्शनाला तुझ्या घरी आले . तू कित्येक वेळा घरी यायला आमंत्रण दिलंस, पण कधीच येणं जमलं नाही. आज तुझ्या आईला हतबल पाहून काय घडलंय हे क्षणभर कळलच नाही. ज्या घरात कधी येता आलं नाही त्या घरात आज तुझं शेवटचं दर्शन घ्यावं लागेल असं वाटलंच नव्हतं. काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत. काही भेटी राहून गेल्या याची खंत राहील. जिथे असशील तिथे असंच हसत रहा." अशा शब्दात अंकिताने प्रथमेशासाठी ही पोस्ट लिहिली आहे.

काही वर्षांपूर्वी प्रथमेशच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी प्रथमेशवर आली होती. या कठीण काळात प्रथमेशने कुटुंबाची जबाबदारी सांभाळत आईचा आधार बनला. तिला धीर दिला. अनेक वर्षांपासून प्रथमेश आणि त्याची आई एकत्र सोशल मीडियावर रिल्स बनवत होते आणि त्यांनी अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली होती.























