Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) ही मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपची (BJP) उमेदवार आहे. तिला भाजपने तिची जन्मभूमी असलेल्या हिमाचल प्रदेशातूनच उमेदवारी दिली आहे. सध्या कंगना ही तिच्या निवडणुकांचा प्रचार जोरदार करतेय. त्यामुळे ती ही निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जातोय. पण याच दरम्यान कंगनाने देखील एक मोठी घोषणा केली आहे. कंगना निवडणूक जिंकली तर ती काय करणार असा प्रचार कंगनाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय. त्यावर आता कंगनाने सडेतोड उत्तर दिलंय.
जर कंगना लोकसभेची निवडणूक जिंकली तर बॉलीवूड सोडणार असल्याची घोषणाही तिने केली आहे. आज तकला दिलेल्या मुलाखतीमध्ये कंगनाने ही मोठी घोषणा केली आहे. त्यामुळे जर कंगनाने लोकसभेचं मैदान मारलं तर ती बॉलीवूडचं मैदान सोडणार असल्याचं तिने सांगितलं आहे.
कंगना बॉलीवूड सोडणार?
यावेळी कंगनाला सिनेमा आणि राजकारण हे दोन्ही एकाच वेळी कसं मॅनेज करते यावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने म्हटलं की, मी सिनेमांमध्ये कंटाळून जाते, मी भूमिका करते, दिग्दर्शनही करते. पण जर मला राजकारणामध्ये माझ्याशी लोकं जोडली जात आहेत, असं दिसलं तर मग मी फक्त राजकारणच करेन. कारण मला एका वेळी एकच काम करायचं आहे.
पुढे ती म्हणाली की, जर मला वाटलं की लोकांना माझी गरज आहे, तर मी त्याच दिशेला जाईन. जर मी मंडीतून निवडून आले तर मी राजकारणच करेन. मला अनेक दिग्दर्शकांनी सांगितलं की, राजकारणात नको जाऊस. पण मला लोकांच्या विश्वासाला खरं उतरायचं आहे. माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे लोकांना त्रास होऊ देणं हे योग्य नाही. त्यामुळे जर मला लोकांशी जोडण्याची संधी मिळाली तर मी ती देखील स्वीकारेन. मला वाटतं, लोकांच्या तुमच्याकडून ज्या अपेक्षा आहेत, त्याबद्दल तुम्ही आधी न्याय केला पाहिजे.
राजकारण आणि सिनेमांमध्ये काय फरक?
राजकारण आणि सिनेमांमध्ये काय फरक आहे? यावर बोलताना कंगना म्हणाली की, सिनेमाचं जग हे खोटं असतं, पण राजकारण हे वास्ताविक जग आहे. सिनेमांचं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे. लोकांना आकर्षित करण्यासाठी अनेक गोष्टी रंगवल्या जातात. पण राजकारणात तसं नसतं. इथे लोकांच्या विश्वासाला खरं उतरावं लागतं. मी या क्षेत्रात नवीन आहे, त्यामुळे मला इथून बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.