पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे आजचे सर्वच कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. गेल्या 20 दिवसांपासून ते प्रचाराच्या कामात स्वत:ला झोकून देऊन काम करत होते. तर, राज्यातील बहुतांश जिल्ह्यात त्यांनी जाहीर सभांमधून जनतेला संबोधित केलं आहे. त्यामुळे, त्यांच घसा बसला असून प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांना आरामाचा सल्ला देण्यात आला आहे. आता, त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती देण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचं आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, त्यांचे आज बीडमधील दौरेही रद्द करण्यात आले आहेत. त्यानंतर, बीडमधील (Beed) महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी फेसबुक पोस्ट लिहून शरद पवारांना तब्येतीला जपा असे आवाहन केलंय.
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून शरद पवार बैठका आणि सभांच्या नियोजनात व्यस्त होते. विशेष म्हणजे महाविकास आघाडीची मोट बांधताना अनेकदा बैठकांसाठी तेच केंद्रबिंदू राहिले आहेत. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध असल्याने काँग्रेसची समजूत घालण्याचं किंवा महाविकास आघाडीत सुवर्णमध्य साधण्याचं कामही शरद पवारांनीच केलं आहे. तर, लोकसभा निवडणुकांच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी ते पहिल्या टप्प्यापासून कामाला लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर ते अधिक सक्रीय झाले असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला टक्कर देण्यासाठी स्वत: लोकसभेच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात निलेश लंके यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर त्यांनी आपला घसा बसल्याचे सांगितले होते. मात्र, तरीही प्रचारसभा घेत त्यांनी पुढेही अनेक ठिकाणी सभा केल्या आहेत. या निवडणूक दौऱ्यांचा व सभांचा ताण पडल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळेच, त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द झाले आहेत. विशेष म्हणजे बारामती येथील सभेत भाषण करताना त्यांचा आवाज बसल्याचे जाणवत होते. घसा बसल्याने त्यांचे शब्द फुटत नव्हते. तरीही, लेकीसाठी त्यांनी 4 ते 5 मिनिटांचे भाषण करुन बारामती गाजवली. आता, रोहित पवार यांनी त्यांच्या प्रकृतीची अपडे माहिती दिली आहे.
रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेऊन तब्बेतीची विचारपूस केली. त्यानंतर, माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रकृतीची अपडेट माहितीही शेअर केली आहे. गेल्या 20 दिवसांपासून शरद पवार निवडणूक प्रचारासाठी रात्रं-दिवस फिरायचे. निवडणुकांच्या धामधुमीतून केवळ 4 तास झोपायचे. मात्र, आता शरद पवार यांची तब्बेत चांगली असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. तसेच, आज बीड भागात त्यांच्या सभा आणि दौरा होता, तसेच पुण्यातही त्यांची सभा होणार होती. मात्र, प्रकृती अस्वास्थेमुळे त्यांचे आजचे सर्वच दौरे रद्द करण्यात आल्याचेही रोहित यांनी सांगितले.
बजरंग सोनावणेंची फेसबुक पोस्ट
साहेब, तब्येतीला जपा!
तब्येतीच्या कारणास्तव उद्या माझ्या प्रचारार्थ आयोजित आष्टीतील सभेला आपण येणार नाही, हे समजलं आणि साताऱ्याच्या सभेची आठवण झाली. तेव्हा तुम्ही पावसाला थांबू शकला नव्हतात, पण तेव्हा पाऊसही तुम्हाला थांबू शकला नाही..
तुमची तब्येत खराब झाल्याचे कळले. मागील पाच-सहा दशके अशा निवडणुका कित्येक बघितल्या असतील तुम्ही. तुमच्या नावावरच झाल्या त्या! मागील कित्येक दशके महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीला अभिमानानं आव्हान देतो. पण साहेब, आता आमचं ऐका! आता ही खिंड आम्हालाच लढू द्या. तुम्ही फक्त आणि फक्त तब्येतीला जपा.
लढणं, तेही विपरीत परिस्थितीत, तुम्ही या देशाला दाखवून दिलंय. विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो! आता पुढची जबाबदारी आमची. ही निवडणूक आता शरद पवारांचे कार्यकर्ते म्हणूनच लढू द्या! साहेब फक्त प्रकृतीची काळजी घ्या. महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकत नाही हा इतिहास आहे. तो इतिहास आम्ही जपू, तुम्ही फक्त, तब्येतीला जपा साहेब. आणि तुमचा आशीर्वाद पाठीशी राहुद्या.
~ तुमचा,
बजरंग बप्पा!