Jai Jai Swami Samarth Colours Marathi Track: 'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे...', नवरात्रीच्या पावन पर्वात होणार 'जागर शक्तीचा', पाहायला मिळणार स्वामींचा अलौकिक महीमा
Jai Jai Swami Samarth Colours Marathi Track: 'जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा' या विशेष भागांमध्ये स्वामी काही पीडित स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्या मनात दडलेल्या शक्तीची जाणीव करून देणार आहेत आणि एका महिषासुरी प्रवृत्तीविरुद्ध त्यांना सीमोल्लंघनासाठी तयार करणार आहेत.

Jai Jai Swami Samarth Colours Marathi Track: नवरात्री (Navratri) म्हणजे, आदिशक्तीचा उत्सव… स्त्रीच्या सामर्थ्याचा जागर… आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा! याच नवरात्रीच्या पावन पर्वावर स्वामींच्या (Jai Jai Swami Samarth) कथेत एक अत्यंत भव्य, नाट्यमय आणि प्रेरणादायी पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा' या विशेष भागांमध्ये स्वामी काही पीडित स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्या मनात दडलेल्या शक्तीची जाणीव करून देणार आहेत आणि एका महिषासुरी प्रवृत्तीविरुद्ध त्यांना सीमोल्लंघनासाठी तयार करणार आहेत.
या गोष्टीच्या केंद्रस्थानी आहे अक्कलकोटच्या सुभेदाराचा मेव्हणा रणजीत. सत्तेचा आणि अधिकाराचा गैरवापर करत रणजीतने गावातील अनेकांवर अन्याय केला आहे. त्याच्या अत्याचाराला बळी पडलेल्या काही स्त्रियांची कहाणी या विशेष पर्वातून समोर येणार आहे. चौघींची परिस्थिती वेगळी असली, तरी त्यांच्या आयुष्यातील वेदनेचं मूळ एकच आहे रणजीतची महिषासुरी प्रवृत्ती. येत्या भागांमध्ये रंगणार स्वामी विरुद्ध रणजीत संघर्ष! या गोष्टीची सुरुवात होते ती स्वामींच्या एका विलक्षण लीलेनं. येणाऱ्या नवरात्रीत स्त्रीशक्तीचा जागर होणार, अशी जाणीव स्वामी आपल्या सेवेकऱ्यांना करून देतात. त्यांच्या या संकेताने सगळे भारावून जातात. मात्र, या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चार स्त्रियांच्या आयुष्यातील संघर्षाची काळी बाजू उलगडू लागते.
पहिली भेट होते मधुवंतीशी. अवघ्या 21 वर्षांच्या मधुवंतीचं कुंकू रणजीतमुळे पुसलं गेलं आहे. रणजीतसोबत कुस्तीत जिंकलेल्या तिच्या पतीचा त्याने क्रूरपणे खून केला आहे. पतीच्या मृत्यूनंतर देवळात जाऊन आक्रोश करणारी मधुवंती न्यायासाठी देवाकडे साकडं घालते… आणि त्याच क्षणी तिच्या आयुष्यात स्वामींचा प्रवेश होतो. मधुवंतीला धीर देत स्वामी तिला आश्वासन देतात, "तुला न्याय मिळेल..." पण मधुवंतीला न्याय मिळवून देण्याचा हा प्रवास सोपा नसणार आहे. रणजीत तिच्या दुःखातही अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. तिच्या पतीच्या मृत्यूपश्चात विधींमध्येही विघ्न आणणार. मात्र, प्रत्येक वेळी स्वामींची लीला तिच्या मदतीला धावून येणार.

याचवेळी स्वामी आणि रणजीत यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडते. स्त्रीच्या शीलाला आणि आत्मसन्मानाला हात घालणाऱ्या रणजीतला स्वामी ठाम शब्दांत सुनावतात. स्त्रिया दुबळ्या आहेत आणि त्या आपलं काहीच वाकडं करू शकत नाहीत, असा अहंकार असलेल्या रणजीतला स्वामी स्त्रीच्या अंतरंगात दडलेल्या देवीशक्तीची जाणीव करून देतात. "तू विसरतो आहेस… नवरात्र येत आहे!" स्वामींचा हा इशारा रणजीतला हादरवून सोडतो. कारण ज्यांना तो आजवर दुर्बल समजत आला आहे, त्याच स्त्रिया आता त्याच्याविरुद्ध उभ्या राहणार आहेत.
रणजीत या स्त्रियांना नामोहरम करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणार आहे. धमक्या, दबाव, हल्ले आणि सत्तेचा गैरवापर करत तो चौघींना घाबरवण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, प्रत्येक वेळी स्वामी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. येणाऱ्या नवरात्रीत स्वामींच्या या लीलेतून चार पीडित स्त्रियांचा प्रवास केवळ दुःखातून संघर्षाकडे नाही, तर संघर्षातून आत्मसामर्थ्याकडे होणार आहे. आणि या प्रवासाची परिणती होणार आहे विजयादशमीच्या सीमोल्लंघनात!
पण या चार स्त्रियांमध्ये दडलेली ही शक्ती नेमकी जागी कशी होणार? रणजीतच्या अत्याचारांना त्या कशा सामोऱ्या जाणार? आणि या संपूर्ण संघर्षात स्वामींची लीला त्यांना कुठपर्यंत घेऊन जाणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी 'जागर शक्तीचा – महिमा स्वामींचा' हे विशेष भाग नक्की पाहा. कारण ही केवळ चार स्त्रियांची कथा नाही… ही प्रत्येक स्त्रीच्या अंतर्मनात दडलेल्या शक्तीची, आत्मसन्मानाची आणि स्वतःसाठी उभं राहण्याच्या सामर्थ्याची गोष्ट आहे!





















