'कोरोना-लॉकडाउन'ची प्रक्रिया सुरू झाली, त्याच वेळेस "मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ, मुंबई'च्या कार्यकारिणीच्या बैठकीत (19 मार्च) अडचणींचा विचार करून "रंगमंच कामगार संघटना'ला व नाट्य व्यवस्थापक संघटना तसेच बुकिंग क्लार्क यांना अर्थ सहाय्य देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, काही तांत्रिक पुर्ततेअभावी संस्थेचे बँक खाते स्थगित होते. परिणामी, अर्थसहाय्य निर्णयाची कार्यवाही होऊ शकली नाही.
दरम्यान, "रंगमच कामगार संघटने"ने आपल्या संस्था सदस्यांची संख्या अधिक असल्याने अधिक अर्थ सहाय्याची लेखी कार्यकारिणीच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित राहून केली होती. त्यावर पूर्वीप्रमाणे विद्यमान कार्यकारिणीतही सकारात्मक चर्चा होऊन आणि 'न्यासाच्या व बँकेच्या कागदपत्रांची पुर्तता होताच तातडीने हे अर्थ सहाय्याचे धनादेश काढावे,' असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानुसार, संस्थेचे बँक खाते आता कामकाजासाठी खुले होताच, वरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
लॉकडाऊनंतरच्या नव्या वर्षात पहिल्या मराठी सिनेमाची तारीख जाहीर
यासाठी 'मराठी रंगभूमी दिनाचे (5 नोव्हेंबर) औचित्य साधून यशवंतराव चव्हाण नाट्य मंदिर, माटुंगा येथे 'नाट्य निर्माता संघा'चे अध्यक्ष संतोष काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात, वरील 'रंगमच कामगार संघ' आणि 'नाट्य व्यवस्थापक संघ', पदाधिकारी तसेच बुकिंग क्लार्क यांच्या उपस्थितीमध्ये अर्थसहाय्याचे धनादेश देण्यात आले. या कार्यक्रमाला 'अ.भा. मराठी नाट्य परिषद'चे अध्यक्ष प्रसाद कांबळी, उपाध्यक्ष नाथाभाऊ चितळे, ज्येष्ठ नाट्य निर्माते अशोक हांडे, संतोष कोचरेकर, ज्येष्ठ कलावंत राजन भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते 'रंगमंच कामगार संघा'चे अध्यक्ष किरण वेल्हे, 'नाट्य व्यवस्थापक संघा'चे प्रमुख कार्यवाह हरिभाऊ पाटणकर, नितीन नाईक, छोटू आजगांवकर यांच्याकडे अर्थसहाय्यचे चेक सुपूर्द करण्यात आले.
हे अर्थसहाय्य पुढिलप्रमाणे देण्यात आले
- "रंगमंच कामगार संघ" 5 लाख रुपये.
- "अ भा मराठी नाट्य परिषद"ने रंगमच कामगारांना लॉकडाउन काळात, अर्थसहाय्य देण्यासाठी 'रंगकर्मी मदत निधी'ची निर्मिती केली आहे. या कार्याला 5 लाख रुपये.
- नाट्य व्यवस्थापक संघाला आणि बुकिंग क्लार्क यांना एकत्रित असे 1लाख रुपये.
"रंगमंच कामगार हा नाट्य व्यवसायाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यांना अर्थसहाय्य देण्यास उशीर झाला तरी दिवाळीच्या आधी त्यांच्या हाती रक्कम पोहोच व्हावी, अशी भावना 'नाट्य निर्माता संघ'ची आहे,' असे अध्यक्ष संतोष काणेकर यांनी प्रास्ताविकात सांगितले. सर्व मान्यवरांचेही मार्गदर्शन होते.
'नाट्यगृहे शासनाने नाट्य प्रयोगांसाठी खुली केली तरी, नाट्य व्यवसाय पुर्ववत उभा राहाण्यासाठी नाट्य निर्मात्याला शासकीय अर्थ सहाय्याची आवश्यकता कशी आहे? त्याबाबत शासनाने आपली भुमिका जाहीर करावी,' अशी मागणी प्रसाद कांबळी यांनी केली.
'नाट्य व्यवसायापुढे येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी संघटनशक्ती मजबुत ठेवा,अभेद्य ठेवा,' असे आवाहन प्रमुख राहुल भंडारे यांनी आभाराच्या भाषणात केले. या कार्यक्रमाला रंगमंच कामगार,बुकिंग क्लार्क व रंगकर्मी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'नाट्य निर्माता संघा'चे उपाध्यक्ष ज्ञानेश महाराव यांनी केले. व्यवस्थापन सहकार्यवाह सुशील आंबेकर यांनी केले.