मुंबई : लॉकडाऊन झाल्यामुळे अनेक सिनेमे प्रदर्शित व्हायचे थांबले. सर्वच भाषेतल्या सिनेमांना हा फटका बसला. आता राज्य सरकारने थिएटर खुली करण्याची परवानगी दिल्यानंतर पुन्हा एकदा सर्वच सिनेमेकर आपल्या सिनेमाच्या तारखा ठरवू लागली. यात समीर आशा पाटील दिग्दर्शित डार्लिग या चित्रपटाने बाजी मारली आहे. या सिनेमाची आपल्या प्रदर्शनाची तारीख ठरवली असून नव्या वर्षातल्या पहिल्या शुक्रवारी म्हणजे 7 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यात प्रथमेश परबची मुख्य भूमिका असून, त्याचा लूकही आता लॉंच करण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या भयावह महामारीच्या सावटाखाली जगत आहे. मनोरंजन विश्वही याला अपवाद नाही. एकीकडे हळूहळू या महामारीचा कहर कमी होत असताना दुसरीकडे सिनेरसिकांनाही नवनवीन सिनेमे पाहण्याचे वेध लागू लागले आहेत. नवीन सिनेमांच्या माध्यमातून होणाऱ्या मनोरंजनापासून दूर राहिल्याने कंटाळलेल्या प्रेक्षकांना लवकरच काहीतरी मनोरंजक पाहायला मिळणार आहे. ‘टाईमपास’फेम ‘टकाटक’ प्रथमेश परब आपल्या चाहत्यांना आश्वर्याचा धक्का देण्यासाठी सज्ज झाला असून, त्याचा ‘डार्लिंग’ लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
‘डार्लिंग’मधून प्रथमेश परब एका नव्या रूपात आणि एका नव्या ढंगात सिनेरसिकांना भेटणार आहे. प्रथमेशच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असून ‘टाईमपास’मध्ये दगडू बनून तर ‘टकाटक’मध्ये ठोक्याच्या रूपात धमाल करणारा त्यांचा लाडका अभिनेता आता कोणते रंग उधळणार याबाबतची उत्सुकता संपूर्ण सिनेसृष्टीला लागली आहे. निर्माते अमित धुपे, अजय ठाकूर, व्ही. जे. शलाका आणि निखील खजिनदार यांच्या 7 हॉर्स एंटरटेनमेंट प्रा. लि., व्ही. पतके फिल्म्स आणि कथाकार मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली तयार केलेल्या ‘डार्लिंग’ या आगामी सिनेमात प्रथमेश मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केलं असून, पुन्हा एकदा प्रथमेशच्या जोडीला अभिनेत्री रितीका श्रोत्री दिसणार आहे.
‘डार्लिंग’चं मोशन पोस्टर आणि रितीकाचा फर्स्ट लूकही रिव्हील करण्यात आला, त्यामुळे या सिनेमात रितीकाचा नायक कोण बनला असल्याबाबत सिनेसृष्टीपासून सिनेरसिकांपर्यंत सर्वांमध्येच चर्चा सुरू होती, पण आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ‘डार्लिंग’ सिनेमात पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्यांची आवडती ‘टकाटक’ जोडी दिसणार आहे. ‘डार्लिंग’ या सिनेमात दोघे कोणत्या प्रकारच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. त्याबाबत अद्याप गुपित राखण्यात आलं असलं तरी प्रथमेश-रितीकाची जोडी ‘डार्लिंग’मध्ये दुसऱ्यांदा प्रेक्षकांवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झाल्याचं म्हणायला हरकत नाही. प्रथमेशनं आजवर मराठीपासून हिंदी सिनेमापर्यंत आपल्या वाट्याला आलेल्या सर्वच व्यक्तिरेखांना न्याय दिला आहे. थोडक्यात काय तर दोघांच्याही अभिनयावर प्रेक्षक फिदा आहेत, त्यामुळे आता ‘डार्लिंग’ या सिनेमात ही जोडी पुन्हा एकत्र आल्यानं सर्वांच्याच अपेक्षा वाढल्या आहेत.
‘चौर्य’, ‘यंटम’ आणि ‘वाघेऱ्या’ या सिनेमांचं यशस्वी दिग्दर्शन करणारे समीर आशा पाटील ‘डार्लिंग’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरणार आहेत. आशयघन पटकथेला सुमधूर संगीताची जोड देत दर्जेदार निर्मितीमूल्यांसोबतच मनोरंजनाने परीपूर्ण असणारा सिनेमा ‘डार्लिंग’च्या रूपात रसिक दरबारी सादर करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे