Alia Bhatt Birthday : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आज (15 मार्च) तिचा 29वा वाढदिवस साजरा करत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) या चित्रपटामुळे आलिया अजूनही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवत आहे. सध्या आलियाकडे अनेक मोठे चित्रपट आहेत, त्यातील अनेक चित्रपट रिलीजसाठीही तयार आहेत. मात्र, अभिनेत्रीने तिच्या करिअरमध्ये असे अनेक चित्रपट धुडकावले, जे नंतर बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले.


आलियाने नाकारलेल्या चित्रपटांमध्ये ‘शेरशाह’चा (shershaah) देखील समावेश आहे. या चित्रपटासाठी कियारा अडवाणी (Kiara Advani) नाही तर, आलिया भट्ट ही दिग्दर्शकाची पहिली पसंती होती. मात्र, आलियाने नकार दिल्याने ‘शेरशाह’ हा चित्रपट कियाराच्या वाट्याला आला.


‘या’ बॉलिवूड चित्रपटांनाही दिला नकार!


‘शेरशाह’बद्दल बोलायचे तर, आलिया भट्टने तिच्या व्यस्त शेड्यूलमुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आलिया भट्टने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीसह संपूर्ण टीमचे कौतुक देखील केले होते. ‘शेरशाह’ व्यतिरिक्त आलिया भट्टने प्रभास स्टारर ‘साहो’, ‘नीरजा’, ‘गोलमाल अगेन’, ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ आणि ‘राबता’सारखे चित्रपट करण्यास नकार दिला होता.


लवकरच झळकणार या चित्रपटांमध्ये!


आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांची यादी तशी बरीच मोठी आहे. तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट आरआरआर (RRR) याच महिन्यात म्हणजे मार्चमध्ये प्रदर्शित होत आहे. एसएस राजामौलींच्या या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात अजय देवगणही दिसणार आहे. ‘आरआरआर’ व्यतिरिक्त आलिया भट्टच्या आगामी चित्रपटांच्या यादीत ‘डार्लिंग्स’, ‘जी ले जरा’, ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’, ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘तख्त’ यांचा समावेश आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha