मुंबई : सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केल्यानंतर लगेचच त्याच्या घरी पोहोचला होता तो त्याचा मित्र दिग्दर्शक संदीप सिंह. सुशांत गेल्यानंतर सर्व सोपस्कार संदीपने पुढाकार घेऊन केले. त्याच्या पोस्टमॉर्टेमपासून त्याच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता संदीप करत होता. पण आता तोच गोत्यात यायची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, भाजपच्या सुब्रमण्यम स्वामींनीही त्याच्या चौकशीची मागणी केली आहे.


संदीप सिंहच्या वावराबाबत सध्या बरीच साशंकता वर्तवली जाते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर पुढच्या 72 तासांत संदीपने रुग्णवाहिकेच्या चालकाला चार फोन केल्याची बातमी आली आहे. सुशांत गेल्यानंतर रुग्णवाहिकेच्या चालकाला चार फोन करायची गरज काय असा सवाल विचारला जात आहे. संदीपच्या कॉल डिटेल्समधून ही बाब उघड झाली आहे. हा त्याच रुग्णवाहिकेचा चालक आहे, ज्याने सुशांतचं पार्थिव पोस्टमार्टेमसाठी नेलं होतं. त्यावरुन आता नव्या वादाला सुरूवात होईल असं दिसत आहे.


दुसरीकडे सुशांतचे कुटुंबीय संदीपला अजिबात ओळखत नसल्याची माहिती राजपूत यांच्या वकिलांनी दिली आहे. संदीप सिंहने या रुग्णवाहिकेला 14 जूनला वांद्र्याच्या सुशांतच्या घरी बोलावलं होतं. याच चालकाला जेव्हा तुला कुणी बोलावलं असं विचारलं तेव्हा त्याने मुंबई पोलिसांच्या सांगण्यावरुन आपण आल्याचं सांगितलं, असा दावा होत आहे. संदीप सिंहवर आता शंकेचं वावटळ घोंगावू लागलं आहे. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी या रुग्णवाहिकेच्या अक्षय नामक चालकाला 14 जूनला तीन फोन केले. तर 16 जूनला एक फोन केला होता. अर्धा ते दीड मिनिट बोलणं झाल्याचं कळतं.


संबंधित बातम्या :