Sunny Deol Blockbuster Hit Gadar 2 : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) बहुचर्चित 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही वर्षांपासून प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेला हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची पाऊले सिनेमागृहाकडे वळत आहेत. गदर चित्रपटाला लोकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली आहे. असाच एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये सनी देओलचे चाहते मोठमोठे ट्रॅक्टर आणि ट्रक घेऊन चित्रपटगृहांकडे जाताना दिसत आहेत. परिस्थिती अशी आहे की चाहते मॉलच्या पार्किंगमध्ये त्यांच्या कारऐवजी ट्रॅक्टर आणि ट्रक पार्क करताना दिसले. प्रत्येक ट्रक आणि ट्रॅक्टरमध्ये तब्बल 20-20 लोक भरून आले होते. त्याचा हा व्हिडीओ राजस्थानातून समोर आला आहे. 






हा व्हिडीओ महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा (Anand Mahindra)  यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले आहे की, 'गदर 2' पाहण्याकरता लोकांनी एवढी गर्दी केली आहे. हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.' सनी देओलने आनंद महिंद्राचे आभार देखील मानले आहेत.


कसा आहे  'गदर 2' 


'गदर 2' हा सिनेमा 2023 मधला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरला आहे. 2001 मध्ये 'गदर : एक प्रेम कथा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता 22 वर्षांनंतर या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'गदर' मध्ये तारा सिंह आणि सकीनाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता 'गदर 2'मध्ये त्यांच्या मुलाला केंद्रीत करण्यात आले आहे. 'गदर 2' या सिनेमाच्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रिलीजच्या तिसऱ्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा 'गदर 2' हा सिनेमा ठरला आहे.


'गदर 2' या सिनेमात सनी देओल आणि अमिषा पटेलसह उत्कर्ष शर्मा आणि सिमरत कौर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अनिल शर्माने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. सनी देओल आणि 'गदर 2'चे चाहते सिनेमा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने सिनेमागृहात जात आहेत. सिनेमागृहात जल्लोष करतानाचे त्यांचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  याआधी 'पठाण'ने 39 कोटी, 'केजीएफ'ने 50.35 कोटी, 'बाहुबली'ने 46.5 कोटी, 'टायगर जिंदा है'ने 45.53 कोटींची कमाई केली होती. तर 'गदर 2'ने रिलीजच्या तिसऱ्या दिवशी 52 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


ही बातमी वाचा: 


Vicky Kaushal : विकी कौशलचा 'द ग्रेट इंडियन फॅमिली' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; मजेदार व्हिडीओ आला समोर