Box Office Collection : मनोरंजनसृष्टी पुन्हा एकदा बहरली आहे. एकीकडे प्रेक्षक प्रतीक्षा करत असलेले सिनेमे सिनेमागृहात प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे ते त्यांच्या लाडक्या सेलिब्रिटींचे सिनेमे पाहायला सिनेमागृहात जात आहेत. तर दुसरीकडे 12 ते 15 ऑगस्ट या लॉन्ग वीकेंडचा सिने-निर्मात्यांना चांगलाच फायदा झाला आहे. देवदर्शन आणि पर्यटनाला जाण्यासह सिनेप्रेमींची पाऊले सिनेमागृहाकडे वळली आहेत. एकंदरीतच थिएटरमधल्या या गर्दीने 100 वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केलेला पाहायला मिळाला आहे.


रजनीकांत (Rajinikanth) यांचा 'जेलर' (Jailer) हा सिनेमा 10 ऑगस्ट 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तर सनी देओल (Sunny Deol) आणि अमिषा पटेल यांचा (Ameesha Patel) 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा आणि अक्षय कुमारचा (Akshay Kumar) 'ओएमजी 2' (OMG 2) हा सिनेमा 11 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. तसेच 'भोला शंकर' (Bhola Shankar) हा दाक्षिणात्य सिनेमाही 11 ऑगस्टलाच प्रदर्शित झाला आहे. या चारही सिनेमांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनने इतिहास रचला आहे. हे चार सिनेमे तीन दिवसांत दोन कोटींपेक्षा अधिक प्रेक्षकांनी पाहिले आहेत. त्यामुळे तीन दिवसांत या सिनेमांनी 390 कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे. 


भारतीय सिनेमांना प्रेक्षकांचा मिळणारा सकारात्मक प्रतिसाद ही मनोरंजनसृष्टीसाठी सुखावणारी बाब आहे. 'जेलर','गदर 2','ओएमजी 2' आणि 'भोला शंकर' या सिनेमांनी तीन दिवसांत रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. देशभरातील सिनेमागृहांत सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गेले आहेत. त्यामुळेच 390 कोटींपेक्षा अधिक बॉक्स ऑफिस कलेक्शन या सिनेमांनी जमवलं आहे.  मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने अधिकृत स्टेटमेंट जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे. 






'गदर 2' या सिनेमाने ओपनिंग वीकेंडला 135 कोटींची कमाई केली आहे. तर खिलाडी कुमारच्या 'ओएमजी'ने 43.06 कोटींची कमाई केली आहे. रजनीकांतच्या 'जेलर'नेदेखील दणदणीत कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने जगभरात 300 कोटींपेक्षा अधिक कोटींचा गल्ला जमवला आहे. 'भोला शंकर' या दाक्षिणात्य सिनेमाचाही बॉक्स ऑफिसवर बोलबाला आहे.


मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार,"चांगलं कथानक, उत्तम कलाकार अशा सर्व गोष्टींच्या कलाकृती असल्यामुळे ते सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. अल्पावधीतच या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. पहाटेचे शो देखील हाऊसफुल्ल जात आहेत. या सिनेमांनी इतिहास रचला आहे". 


13 ऑगस्ट रोजी आतापर्यंतची एका दिवसांतील सगळ्यात जास्त दर्शकांची नोंद


13 ऑगस्ट रोजी आतापर्यंतची एका दिवसांतील सगळ्यात जास्त दर्शकांची नोंद झाल्याचा पीव्हीआर आयनॉक्सचा दावा आहे. 13 ऑगस्ट रोजी  पीव्हीआर आयनॉक्सच्या देशभरांतील सर्व सिनेमागृह मिळून जवळपास 13 लाख दर्शकांची नोंद झाली आहे.


संबंधित बातम्या


Gadar 2 Box Office Collection : सनी देओलचा सिनेमा आता प्रेक्षकांचा झाला; 'Gadar 2'ने तीन दिवसांत केली 135 कोटींपेक्षा अधिक कमाई