रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अदानी समूहाने हडप केल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. स्वातंत्र्यदिनी खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री बचाव न्यायहक्क समिती यांच्यासह हजारो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाला बसणार आहेत. प्रशासनाला जेवढी मुदत द्यायची तेवढी दिली आहे, आता झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागे करण्याची वेळ आली असल्याचा इशारा
शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके व तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंडयाशेठ साळवी यांनी दिला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कुंडी आणि निगुडवाडी येथील जमिनीचा घोटाळा सह्याद्री बचाव न्यायहक्क समितीने बाहेर काढला होता. प्रमुख तक्रारदार दिनेश कांबळे यांनी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन हा घोटाळा कसा झाला आहे याची माहिती दिली होती. अदानी ग्रुप आणि रायपूर राजनांदगाव वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड कंपन्या आणि त्यांचे दलाल यांच्या संगनमताने संगमेश्वर तालुक्यात शेकडो हेक्टर शेतजमीन लाटल्याचा प्रकार खासदार विनायक राऊत यानी उघडकीस आणला. जिल्हा प्रशासनासह राज्य शासनाकडे याबाबतची तक्रार राऊत यांनी केली होती. मात्र, चौकशीचे आश्वासन देऊन राज्य शासनाने या बड्या उद्योजकांना पाठीशी घातले असल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी केला आहे.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख विलास चाळके म्हणाले की, संगमेश्वर तालुक्यातील मौजे निगुडवाडी आणि कुंडी या गावातील वर्षानुवर्षे वहिवाट असलेल्या जमिनी शेतीसाठी वापरात असलेल्या जमिनी ह्या रायपूर राजनांदगाव, वरोरा ट्रान्समिशन लिमिटेड नागपूर आणि अदानी ट्रान्समिशन लिमिटेड या कंपन्यानी राजनांदगाव ते वरोरा गडचिरोली, चंद्रपूर येथील 284.27.97 हेक्टर आर. वनक्षेत्र वर्ग करण्याच्या बदल्यात निगुडवाडी येथील 250.13.00 हेक्टर आर क्षेत्रयापैकी 106.7.17 हेक्टर आर जमीन कुंडी येथील 17.38.87 हेक्टर आर क्षेत्र सन 2015 ते 2018 या कालावधीत जमीन खरेदीचे व्यवहार केले आहेत .
महाराष्ट्र कुल वहिवाट आणि जमीन अधिनियम 1948 चे कलम 63 नियम 156 चे कलम 36 (1) नुसार अटी आणि शर्थींचे पालन न करता या कंपन्यांनी पूर्वनियोजीत दलाल नेमून शेतकऱ्यांच्या जमिनीची फसवणूक करून हडप केल्याचा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केला आहे. काही अधिकाऱ्यांना पैशाचे आमिष दाखवून खोटी, दिशाभूल करणारी कागदपत्रे तयार करून मुखत्याराने जमीन मालकाच्या ठिकाणी बोगस जमीनमालक उभे करून खोट्या मुखत्यारपत्राद्वारे जमिनी खरेदी केल्याचा गंभीर आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख चाळके यानी केला आहे.
या प्रकरणात मोठे रॅकेट असून जमिनी खरेदीचे व्यवहार वारस तपास, फेरफार नोंदी, सातबारा उतारे आदी गोष्टी जिल्हाधिकारी कार्यालायकडून कोणत्याही प्रकारची तपासणी अथवा चौकशी न करता अवघ्या एका आठवड्यात या जमिनी वनविभागाकडे हस्तांतरीत केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाने केला आहे. जमीन हस्तांतर प्रकरणात मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने एका आठवड्यातच जमीन हस्तांतर करण्याच्या “गतीमान” कारभाराचा नामूनाच दाखवून दिला आहे, असा खोचक टोला शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यानी लगावला आहे.