Entertainment News Live Updates 3 October : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!

Entertainment Live :  मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.

एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क Last Updated: 03 Oct 2022 06:10 PM
Wah Re Shiva Song: ‘हर हर महादेव’ चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ गाणं रिलीज; चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित

Har Har Mahadev: झी स्टुडियोजच्या आगामी हर हर महादेव या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत. संगीताच्या बाबतीतही या चित्रपटातून अनेक नवनवे प्रयोग करण्यात आले आहेत. या प्रयोगातील एक महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे ते यातील ‘वाह रे शिवा’ हे गाणं. हितेश मोडक यांच्या जबरदस्त संगीताने आणि मंगेश कांगणे यांच्या तेवढ्याच ताकदीच्या शब्दांनी सजलेलं हे गाणं गायलं आहे दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अत्यंत लोकप्रिय असलेल्या सिद श्रीरामने. या गाण्याद्वारे त्याने छत्रपती शिवरायांच्या गुणांचं आणि पराक्रमांचं वर्णन केलं आहे. अतिशय वेगळ्या धाटणीच्या आवाजाचा धनी असलेल्या सिद श्रीराममुळे या गाण्याला एक स्पेशल टच मिळाला आहे. गाण्यात तसे अवघड असणारे शब्दही त्याने एवढ्या सफाईदारपणे उच्चारले आहेत की त्याच्या भाषेवरचा दाक्षिणात्य प्रभाव कुठेही जाणवत नाही. हे गाणं आजपासून सोशल मीडिया आणि सर्व नामांकित म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध होणार आहे.


Adipurush Teaser: 'आदिपुरुष' मध्ये हा मराठमोळा अभिनेता साकारणार हनुमानाची भूमिका; मराठी मालिका आणि चित्रपटांमधून आलाय प्रेक्षकांच्या भेटीस

Adipurush: दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या  (Prabhas)   'आदिपुरुष' (Adipurush) या चित्रपटाचा टीझर रविवारी (2 ऑक्टोबर) रिलीज झाला. या टीझरनं अनेकांचं लक्ष वेधलं. सध्या  'आदिपुरुष'  या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटात काही मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांनी देखील काम केलं आहे. चित्रपटात प्रभासनं राम ही भूमिका साकारली आहे. तर कृती सेनन (Kriti Sanon) ही सिता या भूमिकेतून आणि सैफ रावण या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  लक्ष्मणाची भूमिका अभिनेता सनी सिंह साकारत आहे. चित्रपटाच्या टीझरमधील एका मराठमोळ्या अभिनेत्यानं आता अनेकांचे लक्ष वेधले आहे. 'आदिपुरुष' या चित्रपटातील रामभक्त हनुमानाची भूमिका देवदत्त नागे (Devdatta Nage) हा मराठमोळा अभिनेता साकारत आहे. तर अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे. 


वाचा सविस्तर बातमी 

Prasad Khandekar: ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीस; महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता प्रसाद खांडेकर करणार दिग्दर्शन

Prasad Khandekar: आपल्या बहारदार सादरीकरणाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा हास्यजत्रेतील कलाकार प्रसाद खांडेकर (Prasad Khandekar) आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसलेला पहायला मिळणार आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ अशा शीर्षकाच्या धमाल चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रसाद खांडेकर करीत आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून त्याच्या चित्रीकरणाला कोकणातल्या निसर्गरम्य वातावरणात सुरुवात झाली आहे. गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), सयाजी शिंदे (Sayaji Shinde), भाऊ कदम (Bhalchandra Kadam), तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit), पॅडी कांबळे, ओंकार भोजने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, नम्रता संभेराव (Namrata Sambherao), रसिका वेंगुर्लेकर आदि कलाकार या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहेत.



Ponniyin Selvan Collection: ऐश्वर्या रायच्या ‘पोन्नियिन सेल्वन' ची बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई; जाणून घ्या कलेक्शन

Ponniyin Selvan Collection: दिग्दर्शक मणिरत्न यांच्या 'पोन्नियिन सेल्वन' (Ponniyin Selvan) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटानं आतापर्यंत 114 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं तमिळनाडुमध्ये जवळपास 22 कोटींचे कलेक्शन केले. जाणून घेऊयात या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबाबत...


शुक्रवारी (30 सप्टेंबर) या चित्रपटानं 39 कोटींचे कलेक्शन केले. तर शनिवारी (1 ऑगस्ट) या चित्रपटानं 36 कोटींचे कलेक्शन केले आहे. तसेच या चित्रपटानं रविवारी (2 ऑगस्ट) या चित्रपटानं 39 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटानं जवळपास 114 कोटींची एकूण कमाई केली आहे. 





Ekta Kapoor : ‘एकता कपूरला अटकेचं वॉरंट मिळालंच नाही!’, निर्मातीच्या वकिलांचा दावा

Ekta Kapoor : टीव्ही निर्माती एकता कपूर (Ekta Kapoor) आणि तिची आई शोभा कपूर (Shobha Kapoor) यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची बातमी नुकतीच चर्चेत आली होती. एकता कपूरच्या प्रोडक्शन हाऊसच्या ‘XXX’ या वेब सीरिजमध्ये सैनिकाच्या एका आक्षेपार्ह दृश्यावरून वाद झाला होता. मात्र, आता एकता कपूरच्या वकिलाने या संपूर्ण प्रकरणात अटक वॉरंट मिळाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. 


वाचा संपूर्ण बातमी

Vikram Vedha: तिसऱ्या दिवशी 'विक्रम वेधा' च्या कमाईत वाढ; बॉक्स ऑफिस कलेक्शन माहितीये?

Vikram Vedha: विक्रम वेधा या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 10.58 कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 12.51 कोटींची कमाई केली. तीसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. या चित्रपटानं तिसऱ्या दिवशी 15 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटाची एकूण कमाई ही 38 कोटी एवढी झाली आहे. लवकरच हा चित्रपट 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल, असा अंदाज लावला जात आहे. 

Guitar Vajtay : आदर्श शिंदेच्या दमदार आवाजात रेकॉर्ड झालं ‘गिटार वाजतंय’ रोमँटिक गाणं! नवरात्रीतही मिळते गाण्याला पसंती

'ती माझी प्रेमकथा' (Ti Majhi Premkatha)  चित्रपटातील तुषार आणि पद्मिनी यांच्या लव्हेबल पोस्टरला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. नवोदित जोडगोळीचे या चित्रपटातील पहिले वहिले प्रेम बहरवणारे 'तुला बघून मनामध्ये गिटार वाजतंय' (Guitar Vajtay ) हे गाणे प्रेमी युगुलांच्या मनाचा ठाव घ्यायला सज्ज झाले आहे. नवरात्रीतही हे गाणे रसिकांना ठेका धरायला लावत आहे. तरुणाईसोबतच सर्वच वयोगटातील रसिकांना भावणारं आणि चित्रपटाच्या कथेशी एकरूप होणारं असं हे गाणं सोशल मीडियावर अफलातून गाजत आहे. रिलीज होताच या गाण्यानं तूफान हिट्स मिळवत सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे.


 


रणदीप हुड्डाच्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात; रिलीज डेटही जाहीर!

नवरात्री आणि दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर निर्माते संदीप सिंह आणि आनंद पंडित यांनी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' (Swatantra Veer Savarkar) या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) दिग्दर्शित आणि अभिनित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात झाली असून, वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त 26 मे 2023 रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.


 





Hawahawai : 'हवाहवाई'तून पहिल्यांदाच उलगडणार फूड स्टॉल चालवणाऱ्या महिलांची संघर्षकथा!

आपण शहरात महिला पोळीभाजी, वडापाव, डोसा अशा विविध पदार्थांचे स्टॉल चालवत असल्याचं पाहतो, अनेकदा त्या फूडस्टॉलवर जाऊन पदार्थ खातो. पण आजवर कधीही या महिलांची फूड स्टॉल चालवण्याच्या संघर्षाची कथा चित्रपटाच्या पडद्यावर आली नाही. पण, प्रसिद्ध दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी 'हवाहवाई' (Hawahawai) या बहुचर्चित चित्रपटातून पहिल्यांदाच हा आगळावेगळा विषय हाताळला असून, 7 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 


 





Ali Fazal, Richa Chadha: हळद आणि मेहेंदी सोहळा संपन्न; रिचा आणि अलीनं शेअर केले खास फोटो

Ali Fazal, Richa Chadha: लवकरच अभिनेता अली फजल आणि रिचा चड्ढा यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे.नुकताच रिचा आणि अली यांचा हळद आणि मेहेंदी सोहळा पार पडला.हळद आणि मेहेंदी सोहळ्यातील फोटो रिचा आणि अलीनं शेअर केले आहेत.





Anaya Soni: किडनी निकामी झाल्याने अभिनेत्री सेटवरच कोसळली!

टीव्ही अभिनेत्री अनाया सोनी (Anaya Soni) हिला किडनी निकामी झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘मेरे साई’ व्यतिरिक्त ती ‘इश्क में मरजावा’ या शोमध्ये देखील दिसली आहे. आता अभिनेत्रीला आर्थिक मदतीची गरज आहे. या संदर्भात अनाया सोनीने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. तिने याबाबत चाहत्यांना माहिती दिली असून, लोकांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. अभिनेत्री अनाया सोनी सेटवर आजारी पडली, त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अनाया सोनी 'मेरे साई'च्या सेटवर शूटिंग करत असतानाच बेशुद्ध पडली. त्यानंतर तिला घाईघाईने रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिच्या प्रकृतीबाबत अनेक खुलासे केले.


 



लावणी नृत्यांगना मेघा घाडगेची 'बिग बॉस मराठी 4'मध्ये धमाकेदार एंट्री

मराठी बिग बॉसच्या चौथ्या सिजनचा ग्रँड प्रीमिअर 2 ऑक्टोबर रोजी प्रसारित झाला. या ग्रँड प्रीमिअर मधून बिग बॉसच्या घरात 16 सदस्यांची ग्रँड एन्ट्री झाली आहे. त्यापैकी एक आहे, मेघा घाडगे. मेघाचा जन्म हा पुण्यात 29 मार्च 1980 मध्ये झाला. आपल्या लावणी नृत्याने सर्वांवर भूरळ घालणारी  मेघा अल्पावधीतच सर्वांच्या गळ्यातील ताईत झालीय. 


 





‘छोटी सरदारनी’चा ग्लॅमरस अंदाज!

'छोटी सरदारनी' या मालिकेमध्ये ‘मेहेर’ची भूमिका साकारून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी अभिनेत्री निमरित कौर अहलुवालिया आता ‘बिग बॉस 16’च्या घराचा भाग बनली आहे. अभिनेत्री निमरित कौर अहलुवालिया सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय आहे. आपले विविध फोटो शेअर करून ती चाहत्यांशी कनेक्टेड राहते. ‘बिग बॉस 16’मध्ये प्रवेश केल्यापासून निमरित कौर अहलुवालिया विशेष चर्चेत आली आहे.


 





Ira Khan : आमिर खानच्या लेकीची एंगेजमेंट रिंग पाहिलीत का? आयराने व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक!

आमिर खानची लेक आयरा मागील बऱ्याच काळापासून नुपूर शिखरेला डेट करत आहे, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान नुपूर शिखरने आयराला लग्नासाठी प्रपोज केले होते. त्यानंतर आयराने स्वतः सोशल मीडियावर या खास क्षणांचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये आयराच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला. तर, आता तिने आपल्या एंगेजमेंट रिंगची झलक देखील चाहत्यांना दाखवली आहे.


 





Malaika Arora : अर्जुन कपूरशी लग्न करण्यासाठी मलायका अरोराची खास प्लॅनिंग; म्हणाली...

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि अभिनेत्री मलायका अरोरा (Maliaka Arora) हे इंडस्ट्रीतील सर्वात हॉट कपल्सपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट केले जाते. दोन्ही सेलिब्रिटी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि त्यांचे व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतात. दोघेही एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांना बॉलिवूड इंडस्ट्रीचे पॉवर कपल देखील म्हटले जाते. मात्र, आता चाहत्यांना अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा ही जोडी लग्न कधी करणार याची उत्सुकता लागली आहे.


 





पार्श्वभूमी

Entertainment Live : मनोरंजन विश्व म्हटलं की, रोज नवनवे गॉसिप हे आलेच. याशिवाय रोज मालिकांमध्ये काय घडतंय? बॉलिवूड विश्वात सध्या काय सुरु आहे? आपल्या लाडक्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांच्या आयुष्यात काय सुरु आहे, या सगळ्याची संपूर्ण आणि जलद माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. आपल्या लाडक्या सेलेब्सबद्दल जाणून घेण्यासाठी सगळेच चाहते उत्सुक असतात. इतकंच नाही तर मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकत असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.


अयोध्येत प्रभासच्या 'आदिपुरुष'चा धमाकेदार टीजर रिलीज, सैफच्या 'रावण' लूकनं वेधलं लक्ष


'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas), सैफ अली खान (Saif Ali Khan), आणि कृती सेनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत आहे. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे. 'आदिपुरुष' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसून येणार आहे. रामाची नगरी असलेल्या अयोध्येत या सिनेमाचा टीझर लॉंच करण्यात आला आहे.


'ऑल इज वेल' म्हणत 'बिग बॉस'चं दार उघडलं; स्पर्धक म्हणून कोणाकोणाची एन्ट्री?


देवमाणूस फेम तेजस्विनी लोणारी, अभिनेता प्रसाद जवादे, मुंबईचा निखिल राजेशिर्के आणि कोल्हापूरची अमृता धोंगडे, 'सातारी बाणा' किरण माने, 'स्प्लिट्सविला' फेम समृद्धी जाधव, अक्षय केळकर, रोडीज फेम योगेश जाधव, पुण्याची 'टॉकर'वडी अमृता देशमुख, ऑटो राणी यशश्री मसुरकर, डान्सच्या दुनियेतला सुपरस्टार विकास सावंत, लावणीक्वीन मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, अभिनेत्री रुचिरा जाधव आणि नृत्य दिग्दर्शक रोहित शिंदे हे स्पर्धक 'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले आहेत.


'जिवाची होतिया काहिली' मालिकेत नवा ट्विस्ट; राज हंचनाळे रावणाच्या भूमिकेत


गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या विषयांवरील मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. सध्या 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. या मालिकेत मराठी आणि कानडी भाषिक प्रेमाची कहाणी छोट्या पडद्यावर दिसत आहे. 'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे प्रमुख भूमिकेत आहे. आता या मालिकेत राज एका विशेष भूमिकेत दिसून येणार आहे.


'पोन्नियिन सेलवन 1'चा धमाका; दोन दिवसांत जगभरात पार केला 150 कोटींचा आकडा


 'पोन्नियिन सेलवन 1' (Ponniyin Selvan 1) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. मणिरत्नमने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. रिलीजच्या दोन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 150 कोटींची कमाई केली आहे. 'पोन्नियिन सेलवन 1' हा सिनेमा 30 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. जगभरात हा सिनेमा तामिळ, तेलुगू, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या सिनेमाने जगभरात 80 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 70 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत या सिनेमाने जगभरात 150 कोटींची कमाई केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.