Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे शिर्डीमध्ये आजपासून (18 जानेवारी) अधिवेशन सुरू होत आहे. मात्र या अधिवेशनापेक्षा सर्वाधिक लक्ष ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर सर्वाधिक अडचणी सापडलेल्या धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. हे दोन्ही नेते या अधिवेशनाला उपस्थित राहणार का नाही? याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू होती. मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ हे अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली होती. मात्र ऐनवेळी धनंजय मुंडे यांनी आपला निर्णय बदलला आहे.


दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र


धनंजय मुंडे आजच्या शिबिराला येणार नसल्याची माहिती धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून देण्यात आली आहे. प्रकृती ठीक नसल्याने आज धनंजय मुंडे परळीमध्येच मुक्काम करणार आहेत. त्यामुळे कालपर्यंत धनंजय मुंडे अधिवेशनासाठी येणार अशी चर्चा असतानाच त्यांनी दांडी मारल्याने भूवया उंचावल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून परळीमध्ये धनंजय मुंडे सक्रिय होते. त्यांनी जनता दरबार सुद्धा घेतला होता. छगन भुजबळ हे सुद्धा पक्षाचे अधिवेशनाला उपस्थित राहणार अशी चर्चा होती. मात्र, त्यांचे चिरंजीव पंकज भुजबळ हे अधिवेशनासाठी पोहोचले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या अधिवेशनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.  


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला टोला 


दरम्यान, अधिवेशनात बोलताना प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला टोला लगावला.  आम्ही सत्तेत सहभागी झालो त्यावर टीका बदनामी केली गेली. अजितदादांची भूमिका योग्य होती हे सिद्ध झालं. बहुजन हित करायचे असेल तर सत्ता हवी ही भूमिका रास्त ठरली, न्यायालयानेही आपली पार्टी हे मान्य केली असल्याचे ते म्हणाले. 


सतीश चव्हाण राष्ट्रवादीत प्रवेश करणार 


दरम्यान, धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांची उपस्थिती नसल्याने चर्चा होत असली, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा एक आमदार गळाला लावण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी शिर्डीमध्ये अधिवेशनाला हजेरी लावली असून  त्यांच्या पक्षप्रवेशाची औपचारिकता राहिली आहे. सतीश चव्हाण परतल्याने राष्ट्रवादीकडून त्यांच्याकडून निलंबनासाठी देण्यात आलेलं पत्र सुद्धा माघारी घेण्यात आलं आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या