Chinmay Mandlekar : काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर भाष्य करणारा ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अवघ्या पाच दिवसांत चित्रपटाने तब्बल 60 कोटींचा गल्ला जमवला. यावरून हा चित्रपट पाहण्याची लोकांमधील उत्सुकता दिसून येत आहे. मराठी चित्रपट-मालिकांमधील आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर गारुड करणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) याने देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.


‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने दहशतवादी बिट्टा कराटे ही भूमिका साकारली आहे. काश्मिरी पंडितांना बेघर करणारा आणि अमानुषपणे त्यांची हत्या करणारा हा बिट्टा कराटे चिन्मयने पडद्यावर हुबेहूब साकारला आहे. या चित्रपटासाठी त्याची निवड अभिनेत्री पल्लवी जोशी हिने केली होती.


सगळं श्रेय पल्लवी जोशीला!


‘बिट्टा कराटे’साठी आपली निवड कशी झाली हे सांगताना चिन्मय म्हणाला की, ‘याचं सगळं श्रेय पल्लवी जोशीला जातं. आम्ही ‘असंभव’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. तेव्हापासून पल्लवीने माझं काम पाहिलं आहे. एक दिवशी तिने मला फोन केला आणि विचारलं की, एका भूमिकेसाठी ऑडीशन देशील का? भूमिका एका काश्मिरी व्यक्तीची आहे. साहजिक मला प्रश्न पडला की, असं पात्र ज्यात मी बसणार देखील नाही, ते मला का सुचवलं? पण मी गेलो ऑडीशन दिली आणि विवेक अग्निहोत्री म्हणाले की हाच आता हे पात्र साकारणार.’


भूमिकेसाठी आवश्यक ते सगळं माझ्या समोर ठेवलं!


या भूमिकेसाठी काय विशेष मेहनत घ्यावी लागली याबद्द्ल सांगताना अभिनेता म्हणाला की, ‘माझी चित्रपटासाठी निवड झाली तो दिवस आणि शूटिंगचा दिवस यामध्ये साधारण 25 दिवसांचा अवधी होता. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्रींनी प्रचंड रिसर्च केला होता, तो त्यांनी माझ्याकडे सोपवला. बिट्टा कराटेचे व्हिडीओ, त्याच्या संबंधी सगळी माहिती माझ्यासमोर ठेवली. या 25 दिवसांच्या वेळेत हा बिट्टा कराटे मी पूर्णपणे आत्मसात केला.’


…शेवटी मला ‘भारत माता की जय’च्या घोषणा द्याव्या लागल्या!


चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक किस्सा यावेळी चिन्मय मांडलेकरने शेअर केला. ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचं शूटिंग मसुरीमध्ये सुरु होतं. त्यावेळी मॉब सीनसाठी काही स्थानिक लोकांना बोलावलं होतं. यावेळी तिथे सेटवरच्या भारतविरोधी घोषणा लोकांनी पाहिल्या. यानंतर जेव्हा चिन्मयने त्याच्या बिट्टा कराटे पात्राचं भाषण केलं, तेव्हा त्या मॉबमधील लोक आम्ही यात काम करणार नाही आणि काम सुरु राहू देणार नाही, यात देशाविरोधात बोललं जात आहे, असं म्हणत शूटिंगमध्ये अडथळा आणला.


मसुरीत आधीच एक गाडी जाऊ शकेल इतका रस्ता, त्यातही या शूटिंगसाठी तब्बल दीड तास हे ट्राफिक थांबवून सीन सुरु होता. अखेर चिन्मयने स्वतः त्या लोकांशी संवाद साधला. त्यांना सांगितलं की, हे केवळ चित्रपटाचं शूटिंग आहे. त्याने शेवटी लोकांना त्याच्या मराठीतील भूमिका दाखवल्या. आपण मराठीत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका सकारात असल्याचे देखील सांगितले. तेव्हा हा मॉब थोडासा निवळला.


लोकांची खात्री तर पटली. मात्र, त्यांनी चिन्मयला एक अट घातली. प्रत्येक सीननंतर आम्ही इथे ‘भारत माता की जय’ ही घोषणा देणार, अशी ती अट होती. त्यांची ही मागणी मान्य करत चिन्मय देखील त्यांच्यात सामील झाला. प्रत्येक सीननंतर थांबून तो स्वतः देखील ‘भारत माता की जय’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार’, ‘जो बोले सो निहाल’ अशा सगळ्या घोषणा देत होता. अर्थात तिथल्या लोकांचं देशप्रेम या निमित्ताने पाहायला मिळाल्याचं चिन्मय मांडलेकर म्हणाला.  



संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha