Proposal Natak: शेवटच्या लोकमधील रात्रीची गोष्ट; अनपेक्षित घडामोडी अन् थरार, ‘प्रपोजल’ नाटकाची सर्वत्र चर्चा
Proposal Natak: मुंबईच्या लोकल प्रवासातील एका वेगळ्याच रात्रीची गोष्ट अनुभवायची असेल, तर ‘प्रपोजल’ नक्कीच बघा.

Proposal Natak Rajan Tamhane: मराठी रंगभूमीवर आपल्या अनुभवसंपन्न दिग्दर्शनाने आणि अभ्यासपूर्ण नाट्यमांडणीने वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक राजन ताम्हाणे (Rajan Tamhane) ‘प्रपोजल’ (Proposal) या गाजलेल्या नाटकाच्या नव्या पर्वासह पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तब्बल 350 यशस्वी प्रयोगांचा टप्पा गाठलेले हे नाटक आता नव्या संचासह रंगभूमीवर दाखल होत आहे. रंगनील निर्मित आणि कल्पना विलास कोठारी प्रस्तुत या नाटकाचे लेखन सुरेश चिखले यांनी केले असून, दिग्दर्शन राजन ताम्हाणे यांचे आहे. जुन्या नाटकाचा गाभा कायम ठेवत बदलत्या काळातील कलाकारांच्या (Entertainment) माध्यमातून त्याला नवा रंग देण्याचा प्रयत्न या निमित्ताने पाहायला मिळणार आहे.
‘शेवटच्या लोकल’चा थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षक सज्ज (Director Rajan Tamhane Brings Back Popular Marathi Play Proposal)
2012 मध्ये रंगभूमीवर आलेल्या ‘प्रपोजल’ला नव्या पिढीसमोर पुन्हा सादर करण्यामागची भूमिका स्पष्ट करताना राजन ताम्हाणे सांगतात की, गेल्या 10 ते 14 वर्षांत प्रेक्षकांची एक नवी पिढी तयार झाली आहे. त्यावेळी जे प्रेक्षक लहान होते, ते आता मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हे नाटक नव्याने अनुभवण्याची संधी आहे. मुंबईकरांच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लोकल ट्रेन या नाटकाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, दिवसभराच्या धावपळीनंतर घरी परतणाऱ्या सर्वसामान्य नोकरदारांचा लोकल प्रवास जिथे संपतो, तिथून या नाटकातील गोष्ट सुरू होते. रात्रीच्या शेवटच्या लोकलमध्ये मोजक्या प्रवाशांच्या उपस्थितीत घडणारे धक्कादायक, विनोदी आणि हृदयस्पर्शी प्रसंग प्रेक्षकांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. मुंबईच्या लोकल प्रवासाचा हा अपरिचित पैलू रंगमंचावर पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न असल्याचे ते सांगतात.
नाटकाच्या पुनरुज्जीवनाबाबत (रिवायवल) आपली भूमिका मांडताना राजन ताम्हाणे संहितेच्या मूळ स्वरूपाबाबत ठाम आहेत. त्यांच्या मते, रिवायवल करताना मूळ संहितेत एक पैशाचाही बदल केला जात नाही. संहितेचा गाभा जपून नव्या कलाकारांच्या माध्यमातून तिचा वेगळा आविष्कार घडवणे, हेच या प्रक्रियेचे खरे वैशिष्ट्य आहे. ‘प्रपोजल’मध्ये लोकलचा डबा हाच नाटकाचा अविभाज्य भाग असल्याने तो तसाच ठेवण्यात आला आहे. बदल झाला आहे तो फक्त त्या डब्यात प्रवास करणाऱ्या पात्रांचा! गेल्या 14 वर्षांत बदललेल्या कलाकारांची देहबोली, संवादफेक आणि अभिनयातील ऊर्जा यामुळे त्याच संहितेचा नवा अनुभव प्रेक्षकांना मिळेल, असा विश्वास ताम्हाणे व्यक्त करतात.
या नव्या पर्वाविषयी बोलताना राजन ताम्हाणे म्हणतात, “रिवायवल करताना संहितेत एक पैशाचाही फरक मी करत नाही. मूळ संहिता अबाधित ठेवून नव्या पिढीतील कलाकारांसोबत नाटक नव्याने उभं करण्यात खरी गंमत आहे. ‘प्रपोजल’चा लोकलचा डबा तोच राहणार आहे; मात्र त्या डब्यात येणारी पात्रं आणि त्यांच्यासोबत घडणारे प्रसंग नव्या कलाकारांच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने समोर येतील. या प्रवासात धक्कादायक, मजेशीर आणि हृदयद्रावक असे अनेक अनुभव आहेत. प्रेक्षकांनी हा नाट्यानुभव प्रत्यक्ष रंगमंचावर येऊन घ्यावा, असं मला वाटतं.”
या नाटकाला प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि राहुल रानडे यांचे संगीत लाभले आहे. मनाली रायसोनी निर्मिती प्रमुख असून, दीपक गोडबोले सूत्रधार म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. 350 प्रयोगांची यशस्वी परंपरा, दमदार संहिता, ज्येष्ठ दिग्दर्शकाचा अनुभव आणि नव्या कलाकारांची ऊर्जा यांचा संगम असलेले ‘प्रपोजल’ पुन्हा एकदा रंगभूमीवर सज्ज झाले आहे. मुंबईच्या लोकल प्रवासातील एका वेगळ्याच रात्रीची गोष्ट अनुभवायची असेल, तर नाट्यरसिकांनी या नाटकाला आवर्जून उपस्थित राहावे. शेवटच्या लोकलमधला हा अनोखा प्रवास, त्यातील अनपेक्षित वळणे आणि माणसांच्या स्वभावाचे विविध पैलू अनुभवण्यासाठी ‘प्रपोजल’चा प्रयोग चुकवू नका!
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















