Sher Shivraj, Waghnakh : ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’नंतर प्रेक्षक आता ‘सरसेनापती हंबीरराव’ आणि ‘शेर शिवराज’ (Sher Shivraj) या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. यातचा आता आणखी एका नव्या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते डॉ. अमोल कोल्हे यांनी त्यांच्या ‘शिवप्रताप’ या चित्रपट मालिकेतील पहिला चित्रपट ‘वाघनखं’ लवकरच रिलीज करण्याची घोषणा केली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचं शौर्य जनमानसात रुजावं म्हणून ‘शिवराज अष्टक’ या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी त्यांच्या या संकल्पनेतील चौथे पुष्प 'शेर शिवराज' प्रेक्षकांच्या भेटीला घेऊ येणार आहेत.


कथा एक अन् चित्रपट दोन!


दिग्पाल लांजेकर यांचा ‘शेर शिवराज’ आणि डॉ. अमोल कोल्हे यांचा ‘वाघनखं’ चित्रपट अफझल खानाचा वध या कथेवर आधारित आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध कसा केला, हे पहायला मिळणार आहे. शिवकाळातील सामाजिक, राजकीय वातावरण, राजांच्या अचूक निर्णयांचा रयतेला होणारा फायदा, शत्रूंची आक्रमणं परतवून लावण्याची शक्ती, अफझलखानाची स्वारी, खानाचा वध करत विजापूरी साम्राज्याला राजांनी लावलेला सुरुंग आणि त्यामुळं हादरलेल्या आदिलशाहीचं यथोचित चित्रण 'शेर शिवराज' मध्ये दिग्पालनं केलं आहे.



तर, स्वराज्याचा भगवा आणि रयतेच्या संरक्षणासाठी राजांनी केलेले पराक्रम याचीच गाथा ‘वाघनखं’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये प्रतापगड, स्वराज्याचा भगवा आणि राजांची वाघनखं दिसत आहेत. अर्थात या चित्रपटातही अफझल खान वधाची कथा पाहायला मिळणार आहे.



शिवरायांच्या अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं चित्रण


प्रतापगड आणि अफझलखान यांचा खूप जवळचा संबंध आहे. राजांना जेरबंद करण्याच्या उद्देशानं भला मोठा फौजफाटा घेऊन सर्व तयारीनिशी खान प्रतापगडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचला खरा, पण पुन्हा माघारी जाऊ शकला नाही. तिथेच त्याची कबर खोदली गेली. कारण, खानाला शिवरायांच्या युद्धनीतीची, बुद्धीचातुर्याची, गनिमी काव्याची यासोबतच संयम, शिष्टाई आणि चतुराई या गुणांची जराही कल्पना नव्हती. शिवरायांच्या याच अद्भुत गुणांचं आणि अनोख्या युद्ध कौशल्याचं चित्रण या दोन्ही चित्रपटांत पाहायला मिळेल.


एकीकडे ‘शिवराज अष्टक’, तर दुसरीकडे ‘शिवप्रताप’!


छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांच्यात रुजावेत यासाठी लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ‘शिवराज अष्टक’ ही संकल्पना हाती घेतली आहे. या संकल्पने अंतर्गत एकूण आठ ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. यातील ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’, ‘पावनखिंड’ हे तीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर, ‘शेर शिवराज’ 22 एप्रिलला रिलीज होणार आहे.


तर, ‘शिवप्रताप’ या चित्रपट मालिकेमधून डॉ. अमोल कोल्हे यांचे जगदंब क्रिएशन्स चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. ‘शिवप्रताप’ नावाच्या चित्रपट मालिकेअंतर्गत ‘वाघनखं’, ‘वचपा’ आणि ‘गरुडझेप’ अशा तीन चित्रपटांची निर्मिती करण्यात येणार आहे. हे तिन्ही चित्रपट केवळ मराठीतच नव्हे, तर हिंदी भाषेतही प्रदर्शित करण्यात येणार आहेत. याची घोषणा 2019मध्येच करण्यात आली होती. मात्र, कोरोना काळात याला ब्रेक लागला होता.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha