Mumbai News : मुंबई विद्यापीठ (Mumbai University) आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांचे नामफलक मराठीत (Marathi Language) करा, अशी मागणी युवासेनंनं (Yuvasena) विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. एकीकडे महाविद्यालयात मराठीची गळचेपी होत आहे आणि दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारकडून चालढकल सुरु आहे. यात अडकून पडलेल्या मायमराठीचं संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी युवासेनेनं या मागण्या केल्या आहेत. विद्यापीठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवासेनेनं स्थगन प्रस्ताव मांडून या मागण्या केल्या आहेत. 


एकिकडे महाविद्यालयीन शिक्षणात होत असलेली मराठी भाषेची गळचेपी तर दुसरीकडे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याबाबतची केंद्र सरकारची चाललेली चालढकल, यात अडकून पडलेल्या माय मराठीचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार होण्यासाठी विद्यापिठाच्या अर्थसंकल्पीय अधिसभेमध्ये युवा सेनेकडून स्थगन प्रस्ताव मांडून काही महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या आहेत. युवासेना सिनेट सदस्य शीतल देवरुखकर शेठ यांनी हा स्थगन प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे, मुंबई विद्यापीठ आणि त्या अंतर्गत येणारी महाविद्यालयातील नामफलक तसेच इतर सूचनाफलक हे दुकानांच्या पाट्या प्रमाणे मराठीत असावे ही प्रमुख मागणी आहे. 


त्यासंदर्भात आज विद्यापीठ प्रशासनाला युवासेना सिनेट सदस्य करून निवेदन देण्यात येणार असून या संदर्भात तातडीने परिपत्रक काढून महाविद्यालयांची नाम फलक मराठीत करण्यात यावेत, अशा प्रकारचा आग्रह केला जाणार असल्याचं, युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी सांगितलं आहे. 


काय आहे प्रस्तावातील मागण्या?



  • विद्यापीठ पातळीवर मराठीभाषा विकास मंडळाची स्थापना करावी व त्याला उचित अर्थ सहाय्य देण्यात यावे.

  • प्रत्येक महाविद्यालयात मराठी वांड्मय मंडाळाची स्थापना अनिवार्य करुन मंडाळाच्या कार्यक्रमांसाठी आर्थिक तरतूद करावी.

  • मराठी ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ दिंडी या सारखे उपक्रम राबावणे

  • महाविद्यालयांच्या नावाचे फलक तसेच ईतर सुचना फलक मराठीमध्ये असावेत.

  • महाविद्यालयांचे प्रवेश अर्ज, माहिती पुस्तिका, भित्ती पत्रके, प्रश्न पत्रिका इ. सर्व मराठी भाषेत उपलब्ध  करण्यात यावे.

  • काही विषयांच्या परीक्षा मराठी माध्यमातून देण्याची सोय करावी.

  • मराठी भाषेतून PH.D करण्यासाठी प्रोत्साहनदायी उपाय योजना कराव्यात.

  • मराठी भाषेचा वापर वाढवण्यासाठी विद्यापिठ पातळीवर  ठोस धोरण आखावे.


वरील मागण्या मान्य करुन लवकरच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे परीपत्रक आणि इतर परीपत्रकं काढण्याचे आश्वासन कुलगुरुंनी दिलं आहे. आश्वासन जरी दिलं असलं तरी युवासेना सिनेट सदस्यांनी आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करायचं ठरवलं आहे. त्यामुळे युवासेना सिनेट सदस्य विद्यापीठ प्रशासन कुलगुरूंची भेट घेऊन या संदर्भात तातडीनं परिपत्रक काढावं, या संदर्भात निवेदन देणार आहे. त्यामुळे यासंदर्भात निर्णय झाल्यास दुकानं कार्यालयीन पाट्या त्यानंतर आता मुंबईतील कॉलेजची नामफलकसुद्धा मराठी पाहायला मिळतील.