Digpal Lanjekar on Chinmay Mandlekar : 'अजूनतरी महाराजांची भूमिका चिन्मयच करणार', निर्णयावर दिग्पाल लांजेकरांनी नेमकं काय म्हटलं?
Digpal Lanjekar on Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकर याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
Digpal Lanjekar on Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) मुलाच्या नावावरुन ट्रोलिंग झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्यावर कलाकार मंडळींसह अनेकांनी त्याला त्याचा हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. चिन्मयने दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक या मालिकेतील सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ती भूमिका प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस पडल्याचं पाहायला मिळालं. चिन्मयने हा निर्णय घेतल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची (Digpal Lanjekar) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी लोकमत फिल्मीशी बातचीत करताना चिन्मयच्या या निर्णयावर भाष्य केलं आहे. चिन्मयने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये त्याने त्याचा निर्णय प्रेक्षकांपर्यंत पोहचवा. चिन्मयच्या बाबतीत झालेल्या या ट्रोलिंगमुळे अनेकांनी त्यावर तीव्र संताप व्यक्त केला आणि त्याला त्याचा निर्णय मागे घेण्याची देखील विनंती केली आहे. पण यावर दिग्पाल लांजेकरांच्या प्रतिक्रियेची वाट अनेकजण पाहत होते, त्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिग्पाल लांजेकरांनी काय म्हटलं?
चिन्मयच्या निर्णयावर दिग्पाल लांजेकरांनी म्हटलं की, चिन्मयशी याविषयी माझी अद्याप सविस्तर चर्चा झालेली नाही. आमचं जुजबी मेसेजच्या रुपात बोलणं झालं. पण, त्याने हा निर्णय घेण्याआधी आमची चर्चा झालेली नाही. शिवराज अष्टक मालिकेत महाराजांची भूमिका अजूनतरी चिन्मयच करणार आहे. पण, आमची चर्चा झाल्यावर अंतिम जे काही आहे ते कळेल.सध्या मी काहीही बोलायला समर्थ नाही कारण, अनेक गोष्टींची मला कल्पना नाही. या सगळ्या गोष्टींवर शिवराज अष्टक अवलंबून आहे. कारण, शिवराज अष्टक मालिका केवळ सिनेमाचा भाग नसून तो लोकांच्या भावनेचा भाग आहे. प्रत्येकाला त्यात सहभागी व्हावं लागेल. चर्चा झाल्याशिवाय सध्या यावर मी काहीही बोलणं चुकीचं ठरेल
दिग्पालशी चर्चा केल्यानंतर चिन्मय त्याचा निर्णय मागे घेणार?
दिग्पाल लांजेकरांच्या प्रतिक्रियेनंतर चिन्मयच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. तसेच दिग्पाल लांजेकर आणि चिन्मय यावर नक्की काय निर्णय घेणार की चिन्मय त्याच्या निर्णयावर ठाम राहणार हे पाहणंही तितकचं महत्त्वाचं ठरेल. त्यामुळे आता चिन्मयच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. आतापर्यंत गौतमी देशपांडे, रवी जाधव, मृण्मयी देशपांडे, सुरुद गोडबोले, सिद्धार्थ चांदेकर, सई ताम्हणकर या कलाकार मंडळींनी चिन्मयच्या बाबतीत घडलेल्या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केलाय. त्याचप्रमाणे त्याला निर्णय मागे घेण्याची देखील विनंती केली आहे.