Marathi Celebrities on Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडेलकर (Chinmay Mandlekar) हा त्याच्या मुलाच्या नावावमुळे सध्या बराच ट्रोल झाला. मुलाचं नाव जहांगीर ठेवून स्वत:महाराजांची भूमिका करत असल्याचं अनेकांनी म्हटलं. इतकच नव्हे तर काहींनी तर त्याला पाकिस्तानात देखील जाण्याचा सल्ला दिला. यावर त्याच्या बायकोने म्हणजेच नेहा जोशी मांडलेकर (Neha Joshi Mandlekar) हीने एक व्हिडिओ शेअर करत तीव्र संपात व्यक्त केला. त्यानंतर या सगळ्यामुळे कुटुंबाला होणाऱ्या त्रासामुळे चिन्मयनेही एक मोठा निर्णय घेतला. त्यानंतर आता मराठी कलाकारांनी देखील यावर अनेक कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे. 


अभिनेत्री गौतमी देशपांडे, दिग्दर्शक सुहृद गोडबोले, अभिनेता अक्षय वाघमारे, दिग्दर्शक समीर विद्वंस, सिद्धार्थ चांदेकर यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. चिन्मयने शेअर केलेला व्हिडिओ रिशेअर करत या कलाकार मंडळींनी चिन्मयसाठी पाठिंबा दर्शवला आहे. सध्या सोशल मीडियावर चिन्मयच्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे. 


लोकांची लायकी नाही चांगलं काही मिळवण्याची - गौतमी देशपांडे


अभिनेत्री गौतमी देशपांडे हीने तिच्या इन्स्टाग्रामवर चिन्मयचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर तिने म्हटलं की, 'याच पद्धतीने कलाकारांना वागणूक द्यायला हवी का? असं सॉफ्ट टार्गेट बनवायचं असेल तर लोकांची लायकी नाही काही चांगलं मिळवण्याची. यामुळे मी अत्यंत निराश झालेय. हे असं व्हायलाच नाही पाहिजे. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत चिन्मय दादा!'


लाज वाटली पाहिजे आपल्याला समाज म्हणून - सुहृद गोडबोले


दिग्दर्शक सुहृद गोडबोले याने देखील हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं की, 'फार दुर्दैवी, लाज वाटली पाहिजे आपल्याला समाज म्हणून. आम्ही तुझ्या सोबत आहोत चिन्मय, नेहा आणि जहांगीर.' 


ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी काहीही घेणंदेणं नाही - समीर विद्वंस


दिग्दर्शक समीर विद्वंसने म्हटलं की, 'हे खूप जास्त दुर्दैवी आहे. आम्ही सगळे तू नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत. एक नक्की आहे की, महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी आणि शिकवणीशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना ते माहित असतील असंही नाही. चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की हा निर्णय मागे घे आणि ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करतोस ती करत रहा!' 


आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग - सिद्धार्थ चांदेकर


जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काहीही देणं घेणं नाहीये. आपल्या मनातली घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग. तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्यासाठी तुझा आदर करतो. ही भूमिका करणं थांबवू नकोस. प्लीज! आम्ही सगळे तू, नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत, असं सिद्धार्थने म्हटलं. 


ही बातमी वाचा : 


'हा बाणा धर्मांध झुंडीच्या ट्रोलींगचं नाक ठेचून पुरून उरतो', किरण मानेंनी चिन्मयला ट्रोलिंगसाठी दिला जालीम उपाय