नागपूर : लोकसभा निवडणुकीत उपराजधानी नागपूरात फक्त 54 टक्के मतदान झालं, म्हणजेच 46 टक्के नागपूरकरांनी मतदानाचं कर्तव्य बजावलच नाही. हे ऐकून नागपूरकर किती बेजबाबदार आहेत असंच कोणालाही वाटेल. मात्र नागपुरात कमी मतदानामागे मतदारांची अनास्था हेच एकमेव कारण नव्हते, तर मतदारयाद्यांमधील प्रचंड घोळ, राजकीय पक्षांचं दुर्लक्ष आणि प्रशासनाची (Election Commission Voter List) घोडचूक जास्त कारणीभूत असल्याचं आता समोर येऊ लागले आहे.


जिवंत व्यक्तीचं नाव मृताच्या यादीत


सुरेश वैतागे नावाचा एक व्यक्ती, जो मतदान करायला गेला असता त्याला मृत असल्याचं सांगण्यात आलं. म्हणजे मतदान यादीत त्याच्या नावासमोर तो मृत असल्याचं नोंदवण्यात आलं होतं. सुरेश वैतागे या व्यक्तीला आपण जिवंत असल्याचं सिद्ध करावं लागलं. तरीही संबंधित व्यक्ती समोर असतानाही त्याला मतदान करता आलं नाही, कारण होतं ते निवडणूक आयोगातील नोंद. वयाच्या पन्नाशीत त्यांच्यावर ही वेळ आणलीय निवडणूक आयोगाने.


हा तोच आयोग आहे जो मतदान हा तुमचा हक्क आहे आणि कर्तव्यही असं आवाहन करतो. एरवी मतदान केलं की राष्ट्रकार्य केल्याचं समाधान मिळतं. मात्र ज्या दिवशी मतदान केलं त्याच दिवसापासून सुरेश वैतागेंना प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागतोय.


भावाचा मृत्यू, पण दोघांचंही नाव डीलीट 


त्याचं झालं असं की नागपूरच्या महाल परिसरात ते मतदान करायला गेले आणि त्यांचं नावच मतदान यादीतून गायब झालं. इतकंच नाही तर त्यांना सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा मृतांसाठी असलेला डिलिटेड हा शेरा त्यांच्या नावासमोर मारला गेल्याचं त्यांना दिसलं.खरंतर सुरशे वैतागे यांच्या भावाचा मृत्यू झाला आहे.त्यांचं नाव डीलीट करताना निवडणूक आयोगाने हा प्रताप केला आणि रांगेत धडधाकटपणे उभे असणाऱ्या सुरेश वैतागेंना ते मृत असल्याचं तोंड वर करून सांगण्यात आलं.


मृत व्यक्तीचं 16 वर्षानंतरही नाव यादीत कायम


हे झालं सुरेश वैतागेंचं. मात्र असाच काहीसा प्रकार घडलाय. नागपूरच्या वरिष्ठ पत्रकार असलेल्या महेश उपदेव यांच्याबाबतीत. उपदेव यांची बहीण मेघा यांचं 2008 साली निधन झालं. त्यानंतर निवडणूक यादीतून त्यांचं वगळण्यासाठी उपदेव कुटुंबाने अर्ज केला, मृत प्रमाणपत्र सादर केलं. मात्र मेघा उपदेव यांचं नाव मतदार यादीतून डीलीट झालं नाहीच. 2009 साल म्हणून नका, 2014 साल म्हणून नका की 2019 साल म्हणून नका. अगदी 16 वर्षांनंतरही मेघा यांचं नाव यादीत जसच्या तसं आहे. 


हजारो मृत आणि स्थलांतरित मतदारांचे नाव मतदार यादीत कायम राहिल्यामुळे मतदानाचा टक्का घसरणार नाही का? बोगस मतदानाला संधी मिळणार नाही का? असे रास्त प्रश्न उपदेव कुटुंबीयांनी उपस्थित केले आहे.


पाच लाख मतदारांसंदर्भात घोळ असल्याची चर्चा


मतदार यादीमधील हा घोळ आता नागपुरात आरोप प्रत्यारोपाचा विषय बनला आहे. भाजपनं या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशी मागणी केली असून दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणी भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केली आहे. 


एवढेच नाही तर कृष्णा खोपडे यांनी त्यांच्याच नागपूर पूर्व या विधानसभा मतदारसंघात तब्बल 35 हजार मृत किंवा स्थलांतरित मतदारांचे नाव मतदार यादीत कायम असल्याचा गंभीर आरोप केला आहे. निवडणूक आयोगानं नागपुरातील मतदारयाद्यांची सखोल चौकशी केली तर किमान पाच लाख मतदारांसंदर्भातला गोंधळ समोर येईल असा खळबळजनक दावाही खोपडे यांनी केला आहे.


पाण्यासारखी प्राथमिक गरजही पुरवली नाही


नागपूर जिल्हा प्रशासनानं यंदा नागपुरात मतदानाचा टक्का वाढेल, नागपूरकर 75 टक्के मतदान करून डिस्टिंक्शन मध्ये उत्तीर्ण होतील असा दावा केला होता. मतदारांना मतदान केंद्रांवर विविध सोय उपलब्ध करून देऊ असा दावा करत मोठा खर्च करत वेगवेगळ्या थीम द्वारे मतदान केंद्र सजवले होते. मात्र मोठमोठ्या घोषणा करणारा नागपूर जिल्हा प्रशासन मतदार याद्यांमधील घोळ दुरुस्त करू शकला नाही. मतदारांना मतदान केंद्रावर सावलीची आणि पाण्याची प्राथमिक गरजही भागवू शकला नाही. त्याचाच जोरदार फटका नागपूरकर मतदारांना बसला आहे. 


म्हणूनच नुसती मतदार केंद्र सजवून, वेगवेगळ्या थीम राबवून, मतदानाचा टक्का वाढत नसतो, तर त्यासाठी निवडणूक यादीतले घोळ वेळत मिटवणे गरजेचं असल्याचं जेव्हा प्रशासानाला कळेल तोच लोकशाहीसाठी खरा सुदिन असेल. 


ही बातमी वाचा: