Jhund : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुख्य भूमिका असलेला 'झुंड' (Jhund) सिनेमा आज सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाचे सिनेसृष्टीतील दिग्गदांसह चाहत्यांकडून कौतुक होत आहे. सोलापुरात नागराज मंजुळे (Nagraj Manjule) दिग्दर्शित झुंड सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. सोलापुरात सिनेमागृहाबाहेर नागराज मंजुळेंचे हाताने रेखाटलेले भलेमोठे पोस्टर लावण्यात आले आहे. 


सोलापुरात ज्या सिनेमागृहाबाहेर दिग्दर्शक नागराज मंजुळे सिनेमाचे पोस्टर बघण्यासाठी फिरायचे. आता त्याच सिनेमागृहाबाहेर नागराज मंजुळे यांचे हाताने रेखाटलेले भलेमोठे पोस्टर लावण्यात आले आहे. सोलापुरातील सुप्रसिद्ध चित्रकार यल्ला-दासी यांनी हे चित्र रेखाटले आहे. 


दिवंगत विश्वनाथ यल्ला, दिवंगत सिद्राम दासी हे दोघे चित्रकार सोलापुरात प्रदर्शित झालेल्या प्रत्येक सिनेमाचे पोस्टर बनवायचे. हे दोघे देशभरात लोकप्रिय होते. यंत्राच्या काळात बॅनर प्रिंटिंग सुरू झाले. पण त्यामुळे हाहाने पेंटिंग करुन लावण्यात येणाऱ्या पोस्टरचा काळ मागे पडला. आता सिनेमागृहाबाहेर डिजिटल स्वरुपातील पोस्टर दिसून येतात. 


'झुंड' सिनेमाच्या निमित्ताने दिवंगत विश्वनाथ यल्ला आणि दिवंगत रामदासी यांच्या दोन्ही मुलांनी पुन्हा एकदा हाताने पोस्टर रेखाटले आहे. या पोस्टरची खासियत म्हणजे सिनेसृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिग्दर्शकाचे हाताने रेखाटलेले पोस्टर सिनेमागृहाच्या बाहेर लावण्यात आले आहे. 


याआधी सोलापुरातील चित्रकार प्रतिक तांदळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तुरीच्या भुसकटाचा वापर करत झुंडची भव्य प्रतिमा साकारली होती. अभिनेता अमिताभ बच्चन, दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि गायक अजय गोगावले यांच्या प्रतिमा या चित्रात साकारण्यात आल्या होत्या.


"2004 पर्यंत आम्ही देखील वडिलांप्रमाणे हाताने कटाऊट पोस्टर तयार केले आहेत. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या आकाराचे चित्र साकारले आहे. ज्यावेळी या कटाऊटचे काम सुरु होते त्यावेळी अनेकजण आवर्जुन थांबून काम बघत होते. पोस्टर लागल्यानंतर देखील अनेकांनी फोन करत कौतूक केले. सिनेमाचे जुने दिवस परत आले अशा प्रकारची भावना लोक व्यक्त करत आहेत. हे पाहून केलेल्या कामाचे समाधान झाले." अशी भावना चित्रकार श्रीनिवास यल्ला आणि चित्रकार नागनाथ दासी यांनी व्यक्त केली. 


"वडिल हयात असल्यापासून आम्ही त्यांच्या हाताखाली शिकत आलो आहोत. त्यामुळे आम्हीदेखील आतापर्यंत अनेक चित्रपटांचे कटाऊट पोस्टर साकारले आहेत. यामध्ये विशेषत: सिनेमातील मुख्य कलाकार, मुख्य नायिका तसेच सिनेमातील काही विशेष सीन्सचे चित्र असायचे. मात्र आमच्या माहितीप्रमाणे चित्रपट सृष्टीच्या इतिहासात पहिल्यांदाच दिग्दर्शकाचा कटाऊट पोस्टर सिनेमागृहाच्या बाहेर लागला आहे. केवळ सिनेमाचे क्रेडिट्स लिहिताना दिग्दर्शकाचे नाव लिहिले होते. या आधी कधीच आम्ही दिग्दर्शकाचे चित्र रेखाटले नव्हते. त्यामुळे हे पहिल्यांदाच घडत आहे.'' अशी भावना चित्रकार नागनाथ दासी यांनी व्यक्त केली आहे. 


संबंधित बातम्या


Jhund : ‘...एकाच फ्रेममध्ये असून मीच माझ्यासाठी इनव्हीजिबल होतो’, अभिनेते किशोर कदम यांची ‘बिग बीं’साठी खास पोस्ट!


Jhund : आमिर खाननं सूचना दिली अन् अमिताभ बच्चन 'झुंड'मध्ये काम करण्यास तयार झाले!


Subodh Bhave, Nagraj Manjule : सुबोध भावेची पोस्ट; नागराजला म्हणाला, 'आमच्या पिढीचा तू...'


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha