Tusshar Kapoor Ott Debut:  बॉलिवूडमध्ये अनेक स्टारकिड्सने पदार्पण केले आहे. यातील काही स्टारकिड्स रुपेरी पडद्यावर यशस्वी झाले. तर, काहींना यशाची चव चाखता आली नाही. काहींच्या वाटेला एकही हिट चित्रपट आला नाही. काहीजणांचा स्ट्रगल अजूनही सुरू आहे. बॉलिवूडमध्ये असा एक अभिनेता आहे ज्याचे वडील सुपरस्टार आहेत आणि बहीण ही 'टीव्ही क्वीन' आहे. मोजके हिट देऊनही वडिलांसारखे स्टारडम न मिळालेला अभिनेता म्हणजे तुषार कपूर. बॉलिवूडचा जम्पिंग जॅक अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा आणि एकता कपूरचा भाऊ असलेला तुषार कपूरने (Tusshar Kapoor) बॉलिवूडमधील काही चित्रपटात काम केले. त्यातील काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप ठरले. आता तुषार कपूर हा ओटीटीवर पाऊल ठेवणार आहे.


तुषारने वर्ष 2001 मध्ये 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात करीना कपूरदेखील होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. त्यानंतर मात्र तुषार कपूरचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. 






अ‍ॅडल्ट  कॉमेडी चित्रपटांत झळकला... 


मुख्य भूमिका असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाही तेव्हा तुषारने मल्टिस्टारर चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. तुषारने अ‍ॅडल्ट कॉमेडी चित्रपटातही काम केले. रोहित शेट्टीच्या गोलमाल फ्रेंचाइझीमध्ये तुषार कपूरची भूमिका राहिली आहे. पण, त्याला अपेक्षित स्टारडम मिळाले नाही. 


ओटीटीवर करणार पदार्पण


तुषार कपूरने अभिनयासोबत सिनेनिर्मितीमध्ये पाऊल ठेवले. अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला लक्ष्मी चित्रपटाची निर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. आता, तुषार कपूर ओटीटीवर डेब्यू करणार आहे. 


बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे नशीब ओटीटी प्लॅटफॉर्मने बदलले आहे. तुषार कपूर आता  'डंक' या चित्रपटातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात तो वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. जो थोडा स्वार्थी आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. आता तुषारचे ओटीटी पदार्पण दमदार होणार, हे लवकरच समजेल.


इतर संबंधित बातमी :