Bangalore Rave Party : काही दिवसांपूर्वी बेंगळुरू पोलिसांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास एका पार्टीवर छापा मारला होता. त्यानंतर लगेच एका फार्म हाऊसवरही छापा मारत कारवाई केली होती. आता या हायप्रोफाईल रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री हेमा हिने देखील ड्रग्जचे सेवन केले असल्याचे बेंगळुरू पोलिसांनी सांगितले आहे. हेमासह 86 जणांच्या वैद्यकीय चाचणीत ही बाब निष्पन्न झाली आहे.
बेंगळुरू पोलिसांनी फार्म हाऊसवर छापा मारल्यानंतर हायप्रोफाइल लोकांसोबत काही सेलिब्रिटी देखील या पार्टीत असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर तेलगू सिनेसृष्टीतील अभिनेत्री हेमा हिने व्हिडीओ जारी करत मी पार्टीत नसल्याचे सांगितले होते. मात्र, आता बेंगळुरू पोलिसांनी हेमाच्या रक्तात ड्रग्ज आढळले असल्याचे सांगितले.
बेंगळुरू पोलिसांनी एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले की, ही घटना 19 आणि 20 मे रोजी घडली. एका वाढदिवसाच्या निमित्ताने मोठी पार्टी आयोजित करण्यात आली होता. मात्र, पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. हेमाकडे तिची विमानाची तिकिटे असून ती बेंगळुरूला गेल्याचा पुरावा असल्याचे पोलिसांनी म्हटले.
बर्थ डे पार्टीच्या आडून रेव्ह पार्टी
समोर आलेल्या माहितीनुसार, वासू नावाच्या एका व्यक्तीची बर्थडे पार्टी आयोजित करण्यात आली होती. या बर्थ डे पार्टीत 100 हून अधिक जण उपस्थित होते. या प्रकरणी 19 मे रोजी तक्रार दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये शांततेचा भंग करणे, एमडीएमए, कोकेन आणि हायड्रो-गंगा सारख्या अवैध पदार्थांचे सेवन करणे, त्याची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे म्हटले गेले.
केंद्रीय गुन्हे शाखेने (सीसीबी) इलेक्ट्रॉनिक सिटी आणि हेब्बागोडी पोलीस ठाण्यांमधून तपास हाती घेतला आहे.
ड्रग्ज चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या लोकांना नोटीस बजावण्याची आणि चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या 86 लोकांमध्ये अभिनेत्री हेमाचाही समावेश आहे.
हेमाने जारी केला होता व्हिडीओ
हेमाने एक व्हिडीओ जारी केला होता. या प्रकरणात आपला काहीही संबंध नसताना आपल्याला ओढण्यात आले असल्याचे हेमाने म्हटले होते. ही घटना घडली तेव्हा आपण हैदराबाद बाहेरील एका फार्महाऊसवर उपस्थित होतो असे तिने सांगितले. माझ्या अटकेबाबत पत्रकार आणि हितचिंतकांचे फोन येत असून मी बेंगळुरू नव्हे तर हैदराबादमध्ये असल्याचे तिने व्हिडीओमध्ये म्हटले होते.