Tunisha Sharma Case : अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. याप्रकरणी शिझानची (Sheezan Khan) चौकशी सुरुच आहे. आज शिझानच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तुनिषा शर्मा आणि शिझानच्या कुटुंबियांचं खूपच चांगलं नातं होतं. तिच्या आयुष्यासंबंधी सर्व गोष्टी ती शिझानच्या कुटुंबियांसोबत शेअर करत होती. अशातच आता पत्रकार परिषदेत शिझानच्या कुटुंबियांनी आरोप केला आहे की,"अल्बम सॉंगसाठी तुनिषाची जबरदस्तीने सही घेतली गेली".
शिझानची बहिण म्हणाली,"आत्महत्येआधी तुनिषा आणि माझं बोलणं झालं होतं. आवाजावरुन ती आनंदी वाटत होती. नाताळची दोन दिवसांची सुट्टी तिला चंदीगडला साजरी करायची होती. सुट्टी मिळवण्यासाठी तिने प्रोडक्शन हाऊसला विनंती करण्यास मला सांगितलं होतं".
बहिण पुढे म्हणाली,"शिझानला नाताळची दोन दिवसांची सुट्टी हवी होती. पण प्रोडक्शन हाऊसकडून तिला सुट्टी मिळत नव्हती. दोन अल्बम सॉंगसाठी तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिची सही घेण्यात आली. मी तिचं तिकीट बुक केलं असून तिच्या सुट्टीसाठी प्रोडक्शन हाऊसला विनंती करत होते".
तुनिषाच्या आईंच्या आरोपांवर शिझानची बहिण म्हणाली,"तुनिषाची इच्छा नसतानाही तिची आई तिला शूटिंगला पाठवायची. हिजाबमधील फोटो शोमधील असल्याचे तुनिषाच्या मामाचे आरोपदेखील फेटाळले आहेत.
दुसरीकडे तुनिषाची आई आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाली होती,"आत्महत्येआधी तुनिषाचा मला फोन आला होता. त्यावेळी ती म्हणाली,"शूटिंगमुळे मी तुला वेळ देऊ शकत नाही. तसेच मला दोन दिवसांची नाताळची सुट्टी आहे. ही दोन दिवसांची सुट्टी चंदीगडला घालवण्याची माझी इच्छा आहे". चंदीगडला जाण्यासाठी मी तिला होकारदेखील दिला होता.
शिझान खानच्या अडचणीत वाढ
अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अभिनेता शिझान खान (Sheezan Khan) हा पोलीस कोठडीत आहे. आरोपी शिजान खान याला वाळीव पोलिसांनी वसई न्यायालयात हजर केले होते. शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 तारखेपर्यंत शिझान खानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 25 डिसेंबर रोजी शिझानला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याला 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता शिझान खानच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. 30 डिसेंबरपर्यंत शिझानला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर 31 डिसेंबरला त्यला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे आता शिझानच्या अडचणीत वाढ झाली आहे.
संबंधित बातम्या