Thank God Controversy : दिग्दर्शक इंद्र कुमार (Indra Kumar) यांचा आगामी चित्रपट थँक गॉड (Thank God) हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता  अजय देवगण (Ajay Devgn), सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) आणि अभिनेत्री रकुलप्रीत सिंह (Rakul Preet Singh) या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. 


वकील हिमांशु श्रीवास्तव यांनी जौनपूर न्यायालयात दिग्दर्शक इंद्र कुमार, अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. याचिकाकर्त्याचा जबाब 18 नोव्हेंबरला नोंदवला जाणार आहे. याचिकार्त्याच्या मते, चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये धर्माची चेष्टा करण्यात आली आहे. तसेच ट्रेलरमध्ये धार्मिक भावना दुखवल्या गेल्या आहेत, असाही आरोप याचिकार्त्यांनी केला आहे. 'चित्रगुप्त हा कर्माचा देव मानला जातो आणि तो माणसाच्या चांगल्या-वाईट कर्मांची नोंद ठेवतो. या देवाला अक्षेपार्ह पद्धतीनं दाखवल्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात.' असं याचिकेमध्ये म्हटलं आहे.  


थँक गॉड चित्रपटामध्ये अजय हा चित्रगुप्त ही भूमिका साकारणार आहे तर सिद्धार्थ हा अशा एका व्यक्तीची भूमिका साकारणार आहे, ज्याच्यासोबत चित्रगुप्त हा गेम ऑफ लाईफ खेळणार आहे. थँक गॉड या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, अशोक ठाकरे, सुनीर खेतरपाल, दीपक मुकुट, आनंद पंडित आणि मार्कंड अधिकारी यांनी केली असून यश शाह सहनिर्माते आहेत. इंद्र कुमार यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट 25 ऑक्टोबरला  प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. अभिनेत्री नोरा फतेही ही देखील थँक गॉड चित्रपटामध्ये महत्त्वाची भूमिका साकारणार आहे.


थँक गॉडसोबत अजयचे चाणक्य, दृश्यम 2, मैदान, रेड 2 आणि सिंघम 3 हे आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्याच्या सिंघम, दृष्यम, तान्हाजी आणि आरआरआर या चित्रपटांमधील अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या :