Tamil Actor Vishal Talks On Corruption:  साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता विशाल (Vishal)हा सध्या त्याच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आहे. विशालनं ट्विटवर एक व्हिडीओ शेअर करुन सेन्सॉर बोर्डावर काही गंभीर आरोप केले आहे.  सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या मुंबई कार्यालयात भ्रष्टाचार होत आहे, असा आरोप विशालनं व्हिडीओच्या माध्यमातून केला आहे. आता माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (Ministry Of Information And Broadcasting) विशालने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर केलेल्या आरोपांची दखल घेतली.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने विशालच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. 


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्वीट


माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट शेअर करण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, 'अभिनेता विशालने समोर आणलेला CBFC मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा अत्यंत दुर्दैवी आहे. सरकार भ्रष्टाचार सहन करत नाही. यामध्ये कोणीही सहभागी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याची चौकशी करण्यासाठी आजच मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. jsfilms.inb@nic.in वर CBFC द्वारे छळवणुकीच्या इतर कोणत्याही घटनांची माहिती देऊन मंत्रालयाला सहकार्य करण्याची विनंती आम्ही करतो.'  






विशालने केले हे आरोप


विशालने ट्विटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये तो   सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनवर भ्रष्टाचाराचा आरोप करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, 'माझ्या मार्क अँटनी (हिंदी व्हर्जन) या चित्रपटासाठी मला 6.5 लाख मोजावे लागले. 2  Transactions, स्क्रीनिंगसाठी 3 लाख आणि प्रमाणपत्रासाठी 3.5 लाख. माझ्या कारकिर्दीत मी कधीही अशा परिस्थितीचा सामना केला नाही. हे मी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या निदर्शनास आणून देत आहे."


"हे मी माझ्यासाठी नाही तर भविष्यातील निर्मात्यांसाठी करत आहे. माझ्या कष्टाचा पैसा भ्रष्टाचारासाठी गेला?  मी पुरावा  देखील देत आहे. आशा आहे की, नेहमीप्रमाणे सत्याचा विजय होईल." असंही विशालनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.


संबंधित बातम्या:


Tamil Actor Vishal Talks On Corruption: 'सिनेमासाठी 6.5 लाख मोजावे लागले...'; तमिळ अभिनेत्याचा सेन्सॉर बोर्डावर गंभीर आरोप