Chala Hawa Yeu Dya : झी मराठीवरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ बाबत एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे. तब्बल 10 वर्षं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केल्यानंतर, गेल्या वर्षी काही कारणांमुळे हा कार्यक्रम बंद करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे चाहते नाराज झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा या कार्यक्रमाचे पुनरागमन होणार असल्याची बातमी आहे. झी मराठीने नुकताच एक प्रोमो शेअर करत ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे.
हा कार्यक्रम ऑगस्ट 2014 पासून मार्च 2024 पर्यंत सातत्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत राहिला. दिग्दर्शक आणि सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पुढे नेण्यात आला होता. त्यांच्यासोबत भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, श्रेया बुगडे, विनीत भोंडे, तुषार देवल, अंकुर वाढवे आणि इतर अनेक कलाकारांनी आपल्या अफलातून अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मनोरंजन केलं.
आता हा कार्यक्रम नव्या स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. झी मराठीने जाहीर केलेल्या प्रोमोमध्ये असे सांगण्यात आले आहे की या नवीन पर्वासाठी विनोदी कलाकारांची ऑडिशन घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रभरातील नवोदित हास्यकलाकारांना या मंचावर येण्याची एक सुवर्णसंधी मिळणार आहे.
प्रोमोमध्ये एक भन्नाट घोषणा केली गेली आहे – “10 वर्षांपूर्वी एक वादळ आलं होतं… 1137 भाग… 9 पर्वं… 10 वर्षांचा प्रवास! आणि आता तेच वादळ पुन्हा येणार आहे. कॉमेडीची सुपारी अख्ख्या महाराष्ट्राला देणार! आता ऑडिशनद्वारे ठरणार कॉमेडीचा डॉन कोण?” अशी रंगतदार झलक दाखवण्यात आली आहे. हा नवा हंगाम लवकरच झी मराठीवर प्रक्षेपित होणार असला, तरी ऑडिशनची तारीख किंवा प्रसारणाची निश्चित तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
पण एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे या प्रोमोमध्ये काही जुन्या आणि लोकप्रिय कलाकारांची अनुपस्थिती आहे. विशेषतः डॉ. निलेश साबळे आणि सागर कारंडे हे दोघे या प्रोमोमध्ये दिसलेले नाहीत. तर दुसरीकडे, श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे हे परिचित चेहरे जरूर झळकले आहेत. याशिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून नाव कमावलेला गौरव मोरेसुद्धा या प्रोमोचा भाग आहे.
मात्र, हे कलाकार केवळ प्रोमोमध्ये दिसले नाहीत की खरंच ते या नव्या पर्वात सहभागी होणार नाहीत – हे सध्या स्पष्ट नाही. त्यामुळे कार्यक्रम सुरु झाल्यानंतरच हे चित्र पूर्णपणे स्पष्ट होईल.
एकंदरीतच, ‘चला हवा येऊ द्या’च्या नव्या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे आणि पुन्हा एकदा हास्याचा बहर अनुभवण्यासाठी प्रेक्षक सज्ज झाले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या