मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. बिहारमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार आहे. एबीपी न्यूजला मिळालेल्या माहितीनुसार रिया चक्रवर्ती आज कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करु शकते. काल रात्री ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांचे ज्युनियर वकील रियाच्या घरी गेले होते. माहितीनुसार रिया चक्रवर्ती आता या प्रकरणात कायद्याची मदत घेऊ शकते.


मात्र रिया कधी आणि कोणत्या कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल करणार का हे अधिकृतरित्या समोर आलेलं नाही. दुसरीकडे बिहारमधून चार पोलिसांचं पथकही मुंबईत दाखल झालं असून ते या प्रकरणाची चौकशी करतील. आज बिहार पोलीस या प्रकरणात मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासाचे महत्त्वाचे दस्तऐवज मागू शकतात.





रियाच्या कुटुंबावरही गंभीर आरोप
सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी 25 जुलै रोजी बिहारच्या पाटण्यातील राजीवनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं."


सीबीआय तपासाची मागणी
सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक लोकांनी, संघटनांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत व्हावा अशी मागणी केली होती. मात्र मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सक्षम असून सीबीआय तपासाची गरज नसल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्प्ट केलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अनेकांचा जबाब नोंदवला असून यापुढेही अनेकांची चौकशी केली जाणार आहे.


सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी मुंबईच्या व्रांद्र्यातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अतिशय कमी वेळात सुशांत सिंह बॉलिवूडमधल्या यशस्वी अभिनेत्यांमध्ये सामील झाला होता. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर बनलेला 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी'मधील त्याच्या कामाचं कौतुक झालं होतं.


संबंधित बातम्या




Sushant Singh Suicide | रिया चक्रवर्तीने आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप