मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सीबीआयने या प्रकरणी तपासाला सुरुवात केली आहे. परंतु, याप्रकरणी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तपास करणाऱ्या ईडीने आरोपी रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटची तपासणी सुरु केली आहे. या तपासातून खुलासा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती एका ड्रग डीलरच्या संपर्कात होती. या प्रकरणी पुढील तपासासाठी ईडीने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ची मदत मागितली आहे.


ईडीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईडीने एनसीबीला पत्र लिहलं आहे, ज्यामध्ये याप्रकरणातील ड्रग अँगलचा तपास करण्यासाठी मदत मागितली आहे. सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग अँगल तर नाही हे जाणून घेण्याचा हेतू आहे.


ईडीने बिहार पोलिसांच्या एफआयआरच्या आधारावर 31 जुलै रोजी मनी लॉन्ड्रिंग केस दाखल केली होती. बिहार पोलिसांनी हा एफआयआर सुशांत सिंह रापजूतचे वडील के. के. सिंह यांच्या तक्रारीनंतर दाखल करून घेतला होता. या प्रकरणी याआधीच ईडीने सुशांतचे वडील, सुशांतची बहिण प्रियांका सिंह आणि मीतू सिंह यांचे जबाब नोंदवले आहेत.


ईडीने सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शौविक, वडिल इंद्रजीत यांचे जबाबही नोंदवले आहेत. याव्यतिरिक्त ईडीने सुशांतचा माजी मॅनेजर, रूममेट सिद्धार्थ पिठानी, हाऊस मॅनेजर सॅमुअल मिरांडा, सीए संदीप इत्यादींची चौकशी केली आहे.


पाहा व्हिडीओ : सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात आता ड्रग्ज कनेक्शन? ईडीचं नार्कोटिक्सला पत्र



सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी तपास करत असलेल्या सीबीआयने मंगळवारी सिद्धार्थ पिठानी, सुशांतचा पर्सनल स्टाफ नीरज सिंह यांच्या चौकशीचं सत्र सुरु ठेवलं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने मुंबई पोलिसांच्या दोन अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं.


सीबीआयची टीमने फॉरेन्सिक टीमसोबत सुशांतच्या फ्लॅटमध्ये दुसऱ्यांदा तपासासाठी दाखल झाली. गेल्या चार दिवसांत सीबीआयची टीम वॉटरस्टोन रिसॉर्टमध्येही दोन वेळा तपासासाठी दाखल झाली होती. सीबीआयची टीम कूपर रुग्णालयातही गेली होती, जिथे सुशांतच्या मृतदेहाची ऑटोप्सी करण्यात आली होती.


परंतु, सीबीआयने आतापर्यंत रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना चौकशीसाठी बोलावलेलं नाही. सीबीआयने दिल्लीतील एम्स रुग्णालयातील फॉरेन्सिक डिपार्टमेंटकडेही सुशांतचा ऑटोप्सी रिपोर्टची तपासणी करण्यासाठी मदत मागितली होती. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सीबीआयने सुशांत सिंहच्या मृत्यू प्रकरणी तपासाची सुत्र हाती घेतली आहेत. याप्रकरणी सीबीआय कसून तपास करत आहे.


महत्त्वाच्या बातम्या :