मुंबई : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आता सीबीआयकडे गेलं आहे. शिवाय ईडीही आता त्याच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी करत आहे. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये रिया चक्रवर्तीविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. तिथे मात्र ईडी सुशांतच्या सर्व आर्थिक व्यवहारांवर बारीक लक्ष ठेवून आहे. त्यांनी केलेल्या तपासात सुशांत आर्थिक विवंचनेत नसल्याचं स्पष्ट झालं आहे. कारण गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुशांतचं वार्षिक उत्पन्न 30 ते 35 कोटी रुपये होतं.

ईडीने सुशांतच्या सर्व बॅंक खात्यांची चौकशी सुरु केली आहे. रिया आणि सुशांतदरम्यान 15 कोटींचे कसे व्यवहार झाले तेही तपासणं सुरु आहे. त्या तपासात सुशांतच्या बँक खात्याची माहिती मिळाली आहे. सुशांतने कुठे कुठे कशी गुंतवणूक केली होती, त्यासाठी सुशांतचे सीए संदीप श्रीधर यांनाही चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाण्याची शक्यता आहे.

14 जूनला सुशांतने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं होतं. परंतु ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा सूर बळकट होऊ लागला. मुंबई पोलिसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण उपस्थित करण्यात आलं. त्यानंतर दोन महिन्यानंतर आता हा तपास सीबीआयकडे देण्यात आला आहे.



सुप्रीम कोर्टाचा निकाल



सुप्रीम कोर्टाने आज (19 ऑगस्ट) हा अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.

सुप्रीम कोर्टाने म्हटलं की, मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती. सुप्रीम कोर्टच्या या निकालानंतर महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसला आहे. दरम्यान महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या या निकालाला आव्हान देऊ शकतं.

या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.



संबंधित बातम्या