मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. त्यासाठी सीबीआयची टीम मुंबईत दाखलही झाली आहे. एकीकडे तपास चालू असताना पुन्हा एकदा नव्या गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. त्याच तपासाचा भाग म्हणून महेश भट्ट आणि रिया यांच्यातल्या फोन मेसेजेस आता उघड झाले आहेत. 8 जूनलाच रियाने महेश भट्ट यांना मेसेज करुन आपण सुशांतला आणि त्याचा फ्लॅट कायमचा सोडला असल्याची माहिती दिली होती. या मसेजेवरुन महेश भट्ट आणि रिया यांच्यातलं नातं काही प्रमाणात उघड होतं.


8 जूनलाच रिया आणि सुशांतमध्ये वाद झाला. त्यानंतर रियाने सुशांतचं घर सोडलं. त्याचवेळी रियाने महेश भट्ट यांना मेसेज केले आणि रियाचे मेसेज आणि त्याला महेश भट्ट यांनी दिलेलं उत्तर असं.


रिया : या सगळ्या परिस्थितीतून आएशा आता पुढे सरकते आहे. आमच्यातला शेवटचा कॉल हा आमच्यासाठी वेकअप कॉल होता. तुम्ही तेव्हाही माझ्यासाठी देवदूत होता आणि यापुढेही राहाल. (महेश भट्ट यांची निर्मिती असलेल्या जिलेबी या चित्रपटात रियाने आएशा ही व्यक्तिरेखा साकारली होती.)


महेश भट्ट : आता मागे वळून पाहू नकोस. जे अशक्य वाटतं आहे ते शक्य करुन दाखव. तुझ्या वडिलांना माझं खूप प्रेम. आता ते खूप आनंदी होतील.


रिया : तुम्ही माझ्या वडिलांबद्दल जे उद्गार काढले आहेत त्यामुळे मला धीर आला आहे. तुम्ही माझ्या वडिलांबद्दल त्या दिवशी जे बोलला होता आणि आता जे बोलला आहात त्यामुळे मला काही निर्णय घेता आले. माझ्या वडिलांच्याही तुमच्याविषयी आदराच्या, प्रेमाच्या भावना आहेत. तुम्ही खास आहात त्याबद्दल धन्यवाद.


महेश भट्ट : तू माझी मुलगीच आहेस जणू. मलाही हलकं वाटतंय.


रिया : माझ्याकडे शब्द नाहीत सर. या भावना माझ्यासाठी सर्वोत्तम आहेत.

महेश भट्ट : तू धाडस दाखवल्याबद्दल धन्यवाद.

याच संवादामध्ये रियाने भट्ट यांना देवदूत म्हटलं आहे. तुम्ही माझ्या पंखांना दोनदा बळ दिलंत. हे एखादा देवदूतच करु शकतो असं ती म्हणते.


8 जूनला रिया सुशांतचं घर सोडून आली. त्यानंतर 14 जूनला सुशांतने आत्महत्या केली होती. सुशांतच्या मृत्यूचं गूढ वाढत असतानाच, आता रिया आणि तिच्या भवताली असणाऱ्या माणसांमध्ये काय घडलं हे हळूहळू बाहेर येऊ लागलं आहे.


आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सुशांतच्या वडिलांनी सहा जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. यात रिया, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित, आई संध्या तिचा मॅनेजर सॅम्युएल मिरांडा आणि श्रुती मोदी यांचा समावेश होतो.