Shivrayancha Chhava Box Office Collection Day 3 : 'शिवरायांचा छावा' (Shivrayancha Chhava) हा बहुप्रतिक्षीत सिनेमा अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या बहुप्रतिक्षीत कलाकृतीची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. अखेर हा सिनेमा प्रदर्शित झाला असून रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी केली आहे.
'शिवरायांचा छावा'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन काय? (Shivrayancha Chhava Box Office Collection Day 3)
'शिवरायांचा छावा' हा सिनेमा 16 फेब्रुवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्या दिवशी या सिनेमाने 0.6 कोटींची दणदणीत कमाई केली. दुसऱ्या दिवशी 0.9 कोटी, तिसऱ्या दिवशी 1.3 कोटींची कमाई केली. तर रिलीजच्या चौथ्या दिवशी आतापर्यंत या सिनेमाने 0.27 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन जमवलं आहे. एकंदरीत रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 3.07 कोटींचा गल्ला जमवला आहे.
छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी यशोगाथा सांगणारा 'शिवरायांचा छावा'
'शिवजयंती'निमित्ताने 'शिवरायांचा छावा' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. शिवप्रेमी आणि सिनेप्रेक्षक मोठ्या संख्येने हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जात आहेत. छत्रपती शंभू महाराजांचा पराक्रम प्रेक्षकांना सिनेमागृहात अनुभवता येत आहे. अहद तंजावर ते तहद पेशावर स्वराज्य सीमा करावी छत्रपती शिवरायांची आज्ञा शिरसावंद्य मानावी. छत्रपती संभाजी महाराजांची पराक्रमी यशोगाथा सांगणारा 'शिवरायांचा छावा' हा सिनेमा आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतुलनीय शौर्य, हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन 'शिवरायांचा छावा' या सिनेमात घडत आहे.
तगडी स्टारकास्ट असलेला 'शिवरायांचा छावा'
'शिवरायांचा छावा' या सिनेमाची स्टारकास्ट खूपच तगडी आहे. मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, भूषण पाटील, रवी काळे, समीर धर्मधिकारी, राहुल देव, विक्रम गायकवाड, भूषण शिवतरे,अमित देशमुख, तृप्ती तोरडमल, ईशा केसकर, प्रसन्न केतकर, अभिजीत श्वेतचंद्र, ज्ञानेश वाडेकर, आशुतोष वाडेकर, बिपीन सुर्वे, दीप्ती लेले, सचिन भिल्लारेसह अनेक एकापेक्षा एक कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
छत्रपती संभाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी मृत्यूलाही ज्यांच्यासमोर ओशाळावं लागलं त्या हिमालयाएवढं कर्तुत्व असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांना मनोमन नमन केलं जातं, अद्वितीय राजकरण, आक्रमक रणनीती अणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली. स्वराज्य रक्षणार्थ अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘शिवरायांचा छावा’ हा भव्य ऐतिहासिकपट सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
संबंधित बातम्या