Salman Khan : बॉलिवूडचा दबंग स्टार अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे चर्चेत आहे. लॉरेन्स बिष्णोई गँगकडून त्याच्या घरावर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गु्न्हे शाखेने पाच जणांना अटक केली असून त्यातील एका आरोपीने कोठडीत आत्महत्या केली. सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी बिष्णोई समाज त्याच्यावर नाराज आहे. सलमानवर गोळीबार करणाऱ्याचा कट आखणारा लॉरेन्स बिष्णोईदेखील (Lawrence Bishnoi) याच समाजातील आहे. आता या सगळ्या घडामोडीत बिष्णोई समाजाने मोठी घोषणा केली आहे.
बिष्णोई समाजाच्या संघटनेने काय म्हटले?
1998 मध्ये चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमान खानने काळवीटाची शिकार केली होती. आता 27 वर्षांनंतर अखिल भारतीय बिश्नोई महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी आपला समाज सलमान खानला माफ करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सलमान खान आणि बिष्णोई समाजातील वाद निवळण्याची शक्यता आहे.
सलमानसमोर बिष्णोई समाजाची अट
बिश्नोई समाजाचे अध्यक्ष देवेंद्र बुडिया यांनी आपल्या वक्व्यतात म्हटले की, 'सोमी अलीने दिलेल्या माफीने काही फरक पडत नाही. यापूर्वी राखी सावंतनेही माफी मागितली होती. पण आरोपी सलमान खानने स्वतः समाजासमोर प्रस्ताव मांडावा की त्याला माफी मागायची आहे. मग त्याने मंदिरासमोर येऊन माफी मागावी आणि समाज त्याला माफ करू शकेल.
बिष्णोई समाजाचा सांगितला नियम...
बुडिया यांनी सांगितले की,'आमच्या 29 नियमांपैकी एक म्हणजे क्षमादय हृदय. यात आमचे मोठे महंत, साधू, नेते, प्रमुख पंच आणि बिष्णोई समाजाचे युवक सर्वजण एकत्र विचार करून त्यांना क्षमा करू शकतात. मात्र त्यांना मंदिरासमोर येऊन शपथ घ्यावी लागेल की, असे चुकीचे काम आपण कधीही करणार नाही आणि पर्यावरण आणि वन्यजीवांचे सदैव रक्षण करू. तसे झाले तर त्यावर विचार करता येईल, असेही बुडिया यांनी सांगितले.
लाँरेन्स बिष्णोईचा या कारणांसाठीच आहे सलमानवर राग...
लॉरेन्स बिष्णोई हा बिष्णोई समाजातून येतो. हा समाज निसर्ग पूजक असून त्या समाजात काळविटांना देवासमान मानले जाते. 1998 मध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सलमान खानने दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. त्यामुळेच लॉरेन्सकडून सलमान खान धमकी देण्यात आली होती.