मुंबई : सलमान खानचा आगामी 'भारत' सिनमा येत्या बुधवारी रिलीज होत आहे. सलमानच्या सिनेमांची त्याचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहतात. अशाच एका सलमानच्या फॅनने सिनेमा पाहण्यासाठी अख्खं थिएटरचं बूक केलं आहे. नाशिकमधील आशिष सिंघल असं या चाहत्याचं नाव आहे.


आशिष सलमानचे सगळे सिनेमे फर्स्ट डे फर्स्ट शो बघतो आणि आता तर गाण्यांमुळे चांगलाच चर्चेत आलेला भाईजानचा भारत मुव्ही फर्स्ट डे, फर्स्ट शो बघण्यासाठी कॉलेज रोडवरील पीव्हीआर हे पूर्ण थिएटरच त्याने बुक केलं आहे. सलमानचा सिनेमा बघण्यासाठी आशिष आपल्या सर्व मित्रांना वाजत गाजत घेऊन जातो. सलमानला भेटण्याची त्याची खूप इच्छा आहे. ज्यादिवशी सलमानची भेट होईल, तो आयुष्यातील सर्वात मोठा क्षण असेल अशी भावना आशिषने व्यक्त केली.


सलमान खानच्या सिनेमाचा आनंद घेण्यासाठी आशिषने संपूर्ण थिएटर बूक केलं आहे. मोठे सिनेमे जेव्हा रिलीज होतात तेव्हा तिकिटांच्या दरात वाढ केली जाते. सलमान खानच्या भारत सिनेमाच्या बाबतीत मात्र असं घडणार नाही. कारण भारत सिनेमाच्या तिकीट दरात वाढ होणार नसल्याचं स्वत: सलमानने स्पष्ट केलं आहे.


भारत सिनेमात सलमान सहा भूमिकांमध्ये दिसणार आहे. यामध्ये तरुण सर्कस चॅम्पियनपासून 60 वर्षाच्या व्यक्तीरेखेत सलमान दिसणार आहे. सिनेमात सहा दशकांचा एका व्यक्तीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे सलमान सहा विविध भूमिकांमध्ये दिसणार आहे. सिनेमात सलमानसोबत कॅटरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ हे देखील झळकणार आहेत.


अतुल अग्निहोत्री, अलवीरा अग्निहोत्री, भूषण कुमार, कृष्ण कुमार आणि सलमान खानने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर अली अब्बास जफरने सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या 5 जूनला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.