'पंतप्रधानांच्या शपथविधीनंतर वेड्यासारखी गर्दी उसळली आणि मी अडकले. कोणीही माझ्या मदतीला आलं नाही, मात्र स्मृती इराणी माझी सुटका करण्यासाठी धावून आल्या. त्यांना माझी दैना समजली. मी घरी सुखरुप पोहचेन, याची त्यांनी खात्री बाळगली. त्यांना काळजी आहे म्हणून त्या जिंकल्या' असं ट्वीट आशा भोसले यांनी केलं आहे.
स्मृती इराणी यांना मोदी मंत्रिमंडळात महिला आणि बालकल्याण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा 55 हजार 120 मतांनी पराभव करत स्मृती जायंट किलर ठरल्या होत्या. काँग्रेसचा बालेकिल्ला खालसा करणाऱ्या स्मृती यांना केंद्रात मोठं मंत्रिपद मिळणं निश्चित होतं. अमेठी विजयानंतर स्मृती इराणी मुंबईतील निवासस्थानापासून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत 14 किलोमीटर अनवाणी चालत गेल्या होत्या.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला रजनीकांत, शाहीद कपूर, करण जोहर, कंगना राणावत, विवेक ओबेरॉय, बोनी कपूर, मधुर भांडारकर, अनुपम खेर, कपिल शर्मा यासारख्या बॉलिवूडमधील कलाकारांनी हजेरी लावली होती. राजकारण, उद्योग, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास आठ हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.