Saira Banu Health Update : दिग्गज अभिनेत्री सायरा बानो प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल
Saira Banu Health Update : दिग्गज अभिनेत्री सायरा बानो (Saira Banu) यांची तब्येत अचानक बिघडली आहे. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Saira Banu Health Update : दिग्गज अभिनेत्री सायरा बानो यांना प्रकृती अस्वास्थामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना ब्लड प्रेशर, हाय शुगर लेव्हल आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तीन दिवसांपूर्वीच सायरा बानो यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, सायरा बानो यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रुग्णालयातील सुत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, सायरा बानो यांची प्रकृती स्थिर असून चिंतेचं काहीही कारण नाही." दरम्यान, सायरा बानो या 77 वर्षांच्या आहे. दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या त्या पत्नी. याच वर्षी जुलैमध्ये दिलीप कुमार यांचं निधन झालं होतं. दिलीप कुमार यांच्या निधनानं सायरा बानो पुरत्या खचल्या आहेत.
दिलीप कुमार यांच्या निधनानंतर सायरा बानो म्हणाल्या होत्या की, "देवानं माझ्या जगण्याचं कारण काढून घेतलंय, माझं अस्तित्व माझ्याकडून हिसकावलंय, दिलीप साहेबांशिवाय मी काहीच विचार करू शकत नाही, कृपया सर्वांनी प्रार्थना करा."
वयाच्या 17 व्या वर्षी सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी 1961 मध्ये शम्मी कपूरसोबत 'जंगली' चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात आपल्या अभिनयाची जादू अशा प्रकारे पसरवली की, त्यांची प्रतिमा रोमँटिक नायिकेची बनली. या चित्रपटासाठी सायराला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठीही नामांकन मिळाले होते.
एका मुलाखतीत बोलताना सायरा बानो यांनी त्यांच्या आणि दिलीप कुमार यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, ज्यावेळी त्या 12 वर्षांच्या होत्या त्यावेळी बॉलिवूड लेजेंड दिलीप कुमार (Dilip Kumar) यांच्यावर त्यांचा जीव जडला होता. त्यानंतर त्यांनी शेवटी दिलीप कुमार यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सायरा बानो यांनी बोलताना दिलीप कुमार आणि त्यांच्या पहिल्या भेटीबाबतही सांगितलं होतं. मुंबईतील महबूब स्टुडियोमध्ये त्या दिलीप कुमार यांना पहिल्यांदा भेल्या होत्या आणि पहिल्या भेटीतच त्या दिलीप कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
