मुंबई  : अभिनेता सैफ अली खानच्या घरात आलेला चोर हा इमारतीतील प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून आत आला असल्याचं समोर आलं आहे. प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस हा फक्त सैफच्या घरातील व्यक्तींनाच आहे. अॅक्सेसशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. त्यामुळे घरातीलच व्यक्तीने हा हल्ला केला की काय असा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. सैफ अली खानच्या घरी चोराने प्रवेश केला आणि त्याच्यावर चाकूने हल्ला केल्याची घटना घडली. सैफ अली खानवर शस्त्रक्रिया झाली असून त्यांनी त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती आहे. 


Saif Ali Khan Attacked : सैफच्या घरी दोन लिफ्ट


सैफ अली खानच्या इमारतीमध्ये दोन लिफ्ट असल्याची माहिती आहे. एक कॉमन लिफ्ट आहे तर एक सैफच्या परिवारासाठीची प्रायव्हेट लिफ्ट आहे. प्रायव्हेट लिफ्टमधून थेट सैफच्या घरामध्ये प्रवेश मिळतो.  पण या प्रायव्हेट लिफ्टमध्ये प्रवेश करण्यासाठी अॅक्सेस कार्डची गरज असते. त्याशिवाय ही लिफ्ट ऑपरेट होत नाही. 


चोराला लिफ्टचा अॅक्सेस कसा मिळाला? 


चोराने या प्रायव्हेट लिफ्टच्या माध्यमातून सैफच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरीनीशी त्याचा सामना झाला. या प्रायव्हेट लिफ्टचा अॅक्सेस चोराला कसा मिळाला हा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. त्यामुळे चोराला घरातीलच कोणत्या व्यक्तीने मदत केली की काय असाही संशय व्यक्त केला जात आहे. 


सैफ अली खानवर चाकूने सहा वार


अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेमधील राहत्या घरात चाकू हल्ला झाला. सैफ अली खानवर 6 वार करण्यात आले असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. हल्ला झाल्यानंतर सैफ अली खानचा मोठा मुलगा इब्राहिम खानने सैफला रुग्णालयात दाखल केलं. या हल्ल्यामध्ये सैफ अली खानच्या मानेवर 10 सेंटीमीटरची  जखम झाली. हात आणि पाठीवरही वार करण्यात आला आहे. पाठीत धारदार शस्त्र खुपसण्यात आले असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली. 


तपासासाठी 15 टीम्स तैनात


याप्रकरणी तपासासाठी पोलिसांच्या 15 टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग होण्याची शक्यता आहे. फ्लोरिंग पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांचीही पोलिस चौकशी सुरू आहे.  हल्लेखोर हा परिचयाचा असून आसपासच्या बिल्डिंगमध्ये कामाला येतृ असल्याचा पोलिसांना संशय आहे.


शेजारच्या इमारतीतून उडी मारून चोराचा प्रवेश


पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, चोराने शेजारील इमारतीतून सैफ अली खानच्या इमारतीत उडी मारून प्रवेश केल्याचं समोर आलं. चोर शेजारील इमारतीतून उडी मारून आल्याचं सीसीटीव्हीत चित्रित झालं आहे. सैफवरील हल्ल्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस, क्राईम ब्रँचच्या 15 टीम्स तयार करण्यात आल्या आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक देखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.


ही बातमी वाचा: