Saif Ali Khan Attack: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) याच्यावर मध्यरात्री 2.30 (16 डिसेंबर) एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 


सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी मुंबई पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे. याचदरम्यान पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, सैफ अली खानच्या घरात घरकाम करणाऱ्या एका महिलेचा जबाब नोंदवला जाणार आहे. घराकाम करणाऱ्या एका महिलेच्या भूमिकेबद्दल पोलिसांना संशय आहे.  घरकाम करणाऱ्या महिलेच्या वैद्यकीय उपचारानंतर जबाब नोंदवला जाईल. याशिवाय सैफ अली खानच्या कर्मचाऱ्यांमधील 3 जणांचे जबाब नोंदवले जात आहेत. 


महिला मदतनीसानेच आरोपीला दिली घरात एन्ट्री- (Reason behind the attack on Saif Ali Khan)


पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला. 


सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार-


अज्ञात व्यक्ती मुख्य दरवाजाच्याशेजारी असलेल्या पहिल्या रुममधून घरात शिरला. या अज्ञात व्यक्तीला सर्वातप्रथम घरात काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अज्ञात व्यक्तीने मोलकरणीच्या हातावर चाकूने वार केला. यामुळे मोलकरणीने आरडाओरडा सुरु केला. मोलकरणीच्या मदतीसाठी सैफ अली खान बाहेर धावून आला. यानंतर सैफ अली खान आणि अज्ञात व्यक्तीमध्ये झटापट झाली. या झटापटीत अज्ञात व्यक्तीने सैफ अली खानच्या हातावर, पाठीवर, मानेवर प्राणघातक वार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.



संबंधित बातमी:


Saif Ali Khan Attack: पहिला वार मोलकरणीच्या हातावर; सैफ अली खानने पाहताच मदतीला धावला, दोघांमध्ये झटापट अन्...