मुंबई: बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री एका चोराने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. सैफवर एकूण सहा वार करण्यात आले. सैफच्या (Saif Ali Khan) वांद्रे येथील  निवासस्थानी रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) तातडीने या घटनेचा तपास सुरु केला आहे. हल्लेखोराला पकडण्यासाठी आणि एकंदरित तपासासाठी मुंबई पोलिसांची सात पथकं कामाला लागली आहेत. काहीवेळापूर्वीच एन्काऊंटर स्पेशालिस्ट अधिकारी दया नायक यांनी सैफच्या वांद्रे येथील इमारतीबाहेर येऊन पाहणी केली. यावेळी पोलिसांच्या हाती एक महत्त्वाचा क्लू लागल्याची माहिती समोर आली आहे. 


पोलिसांच्या पथकाने इमारतीच्या मागच्या बाजूला पाहणी केली. त्यावेळी इमारतीच्या मागच्या बाजूला एक संरक्षक भिंत आहे. ही भिंत पाच-सहा फुटांची आहे. त्यावर लोखंडी जाळीचे कुंपण घालण्यात आले होते. मात्र, अलीकडेच ही जाळी एके ठिकाणी तुटली होती. तिची डागडुजी करण्यात आली नव्हती. या जाळीतून कोणताही व्यक्ती आतमध्ये उडी मारू शकतो. सद्गुरु शरण या इमारतीत मागच्या बाजूने दाखल होण्याचा हा एकच रस्ता आहे. 


या इमारतीच्या मागच्या बाजूला केवळ एकच सुरक्षारक्षक तैनात असतो. उर्वरित सुरक्षारक्षक हे इमारतीच्या पुढच्या बाजूला असतात. त्यामुळे चोर या सुरक्षारक्षकाचा डोळा चुकवून इमारतीमध्ये शिरला असावा आणि त्यानंतर तो पायऱ्या चढून 12 व्या मजल्यावरील सैफच्या घराच पोहोचला असावा, असा अंदाज आहे.


सैफवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला घराची संपूर्ण माहिती


पोलिसांनी सैफ अली खानच्या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. मात्र, आतापर्यंतच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारतीचे गेट, लॉबी किंवा सैफ अली खान राहत असलेल्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कोणतीही व्यक्ती दिसून आलेली नाही. चोर लिफ्टने आला नसावा, कारण लिफ्टमध्ये सीसीटीव्ही आहे. त्यामुळे चोर पायऱ्या चढून वर पोहोचला असावा, असे सांगितले जाते. हा चोर सैफच्या घरातील मोलकरणीच्या खोलीत शिरला. तिकडे दोघांची बाचाबाची सुरु होती. तिच्या हातावर चोराने पहिला वार केला. तोपर्यंत तिकडे पोहोचलेला सैफ अली खान या वादात पडला, तेव्हा चोराने त्याच्यावर धारदार शस्त्राने अनेक वार केले. सैफ अली खान रक्तबंबाळ अवस्थेत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. या गोंधळात चोर घरातून निसटला. 


मात्र, या सगळ्या घटनेतील अनेक गोष्टी संशयास्पद आहेत. सैफच्या  घरात आलेला हा व्यक्ती माहितगार असावा, त्याला घराची संपूर्ण माहिती असावी किंवा त्याने इकडे आधी काम केलेले असावे, असा संशय पोलिसांना आहे. पोलिसांकडून हे सर्व पैलू  तपासून पाहिले जात आहेत. सध्या एक फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. या टीमकडून सैफच्या घरातून पुरावे गोळा केले जात आहेत.



आणखी वाचा


तैमूर-जेहच्या नॅनीसोबत चोराची बाचाबाची, सैफच्या पाठीत मागून धारदार शस्त्र खुपसलं, प्रतिकार करुन चोराला पळवलं